तुषार तपासे, झी मीडिया
The Aloe Vera Farming: कधी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवणे खूप कठिण जाते. त्यामुळं बरेचसे शेतकरी हे पारंपारिक शेतीला फाटा देत आता आधुनिक शेतीकडे वळले आहेत. गावा-खेड्यातील मोठा तरुण वर्ग आता आधुनिक शेती करुन लाखोंचा नफा मिळवत आहे. साताऱ्यातील एका तरुण शेतकऱ्यानेही शेतात आगळा-वेगळा प्रयोग करत यश मिळवले आहे.
आधुनिक शेतीची कास धरत अनेक शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे यशस्वी प्रयोग करतायत आणि त्यातून मोठा फायदा ही मिळवतात. साताऱ्यातील पाडळी येथील ऋषिकेश ढाणे या तरुणाने नोकरी सोडून आणि पारंपरिक शेतीला फाटा देत शेतात कोरफडची लागवड केली आहे.
कोरफडला आंतराष्ट्रीय मागणीमुळे तसेच देशांतर्गत कोरफडीच्या अनेक पदार्थांची मागणी होत असताना त्यातून मोठा फायदा होतो आहे. फक्त कोरफडीतून या प्रगतशील शेतकऱ्याने वर्षाला कोट्यावधी रुपयांची उलाढाल केली आहे. कोरफडीपासून अनेक सौंदर्य उत्पादनांची निर्मिती केली जाते. यामुळं कोरफडीला अधिक मागणीदेखील आहे.
ऋषिकेश ढाणे यांनी तब्बल तीन एकरात आणि शेतांच्या बांधावर कोरफड लागवड केली आहे. ही कोरफड वेगवेगळ्या कंपन्यांना तर ते पाठवताच पण त्याच बरोबर स्वतः देखील या कोरफडीपासून वेगवेगळी उत्पादने ते घेत आहेत. त्यातून त्यांना मोठा नफादेखील मिळतोय. चिकाटी आणि जिद्दीचा जोरावर शेतामध्ये 18 तास मेहनत करत त्यांनं त्याच्यासह कुटुंबाचीही आर्थिक प्रगती साधली आहे.
दोन हजार सालापासून मी शेती करतोय. सुरुवातीला मी ज्वारी, सोयाबीन, तांदुळसारखी पिके घेतली. मात्र, त्यातून तेवढे पैसे मिळायचे नाही. शेतीला वेगळा पर्याय असावा, ज्याला पाणी कमी लागेल, गुरं खाणार नाहीत, असे पिक घ्यावे असा विचार होता. त्यानंतर मी कोरफड लावायचा विचार केला. ही रोपं कोणालातरी विकायची आहे अशा उद्देशाने लागवड केली होती. सुरुवातीला मला उसाच्या शेतीपेक्षा जास्त पैसे यायचे. नंतर कालांतराने पैसे कमी यायला लागले. नंतर याच रोपांपासून काय बनवता येईल, याचा विचार केला. सुरुवातीला किटकनाशक बनवले अनेक कंपन्यांनी त्याला चांगला प्रतिसाद मिळाला, अशी माहिती ऋषिकेश ढाणे यांनी दिली.
तीन एकरांवर आणि शेतीच्या बांधावर 15 ते 16 हजार रोपं लावली आहेत. आत्ताच्या घडीला जेव्हा मी कोरफडपासून उत्पादन बनवायला सुरुवात केली तेव्हा फायदा कोटींच्या घरात जायला सुरुवात झाली आहे, असं ऋषिकेश ढाणे यांनी म्हटलं आहे.
पारंपरिक पिकांना फाटा देत कोरफड शेतीकडे ते वळल्याने त्यांना चांगला फायदा होतो आहे. या कोरफडीपासून साबण, शॅम्पू, ज्यूस अशी विविध उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली आहे.