पुणे : राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच ओमायक्रॉनचं संकटही आणखी गडद होत चाललं आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. सामान्य नागरिकांच्या घरातील आर्थिक बजेटही बिघडलं आहे.
लॉकडाऊनच्या काळात असंख्य लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळे घर आणि व्यवसाय सांभाळणं कठिण होऊन बसलं आहे. बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अनेकजणांनी आत्महत्या केली.
असंच एक प्रकरण पुण्यात समोर आलं आहे. नोकरी गेल्याने पुण्यातील एका तरुणाने आत्महत्या केली. दत्ता पुशीलकर असं या तरुणाचं नाव असून पुण्यातील केशवनगर मुंढवा इथं हा तरुण रहात होता.
दत्ता पुण्यातील नांदे तलावात जीवरक्षक म्हणून काम करत होता. पण लॉकडाऊनमध्ये जलतरण तलाव बंद झाले आणि दत्ताची नोकरी गेली. २०२० पासून काम नसल्याने दत्ता नैराश्यात आला होता. त्यातच आर्थिक घडी बिघडल्याने कौटुंबिक कलहही वाढले होते. याला कंटाळून दत्ताने टोकाचं पाऊल उचललं.