विशाल करोळे, औरंगाबाद : ऑनलाईन खरेदी विक्री ही सध्याची गरज आहे, मात्र यातून अनेकदा फसवणूक सुद्धा होते, औरंगाबादच्या एक 23 वर्षीय तरूणीची अशीच फसवणूक झाली आहे. तब्बल तीन लाखांना, घरचा 10 हजारांचा टेबल विकतांना सायबर भामट्यांनी तिला हा गंडा घातला आहे.
ऑनलाईन खरेदीविक्री आजकाल एकदम सोपी झाली आहे. अॅपवर जायचं, क्लिक करायचं, पैसे भरायचे आणि वस्तू घरी... मात्र यातूनच फसवणुकीचे प्रकार वाढू लागलेत. असाच एक धक्कादायक प्रकार घडलाय औरंगाबादच्या एका तरुणीसोबत घडला आहे. तिला घरातला एक टेबल विकायचं होता. त्यासाठी तिनं ओएलएक्स अॅपवर जाहिरात टाकली. त्यानंतर एका महिलेचा तिला फोन आला. नवरा कॉल करेल, असं सांगितलं. थोड्या वेळानं पुरूषाचा फोन आला. तिच्याकडून अकाऊंटची माहिती घेतली. त्यासाठी कोड स्कॅन करायला सांगितला. काही वेळात तिच्या अकाऊंटला १० हजार रुपये जमाही झाले. मात्र कालांतरानं या अकाऊंटमधून तब्बल ३ लाख रुपये लांबवले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणीनं पोलिसांकडे धाव घेतली.
ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगणं आवश्यक असल्याचं पोलिसांनीही सांगितलं. एक टेबल विकून 10 हजार रुपये मिळवण्याच्या नादात तरूणीनं 3 लाखांची फसवणूक करून घेतली. त्यामुळे असे व्यवहार अतिशय काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे. नाहीतच तुम्हाला लुबाडण्यासाठी ऑनलाईन भामट्यांची फौज बसलेलीच आहे.