मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं तयारी सुरु केली आहे. अब की बार २२० पार, फिर एक बार शिवशाही सरकार अशी घोषणाच भाजपानं दिली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेनेनं २२० जागांचं लक्ष्य ठेवल्याचं भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री राज्यव्यापी दौरा करणार असून सरकारनं केलेल्या विकासाच्या जोरावर मतं मागणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे भाजपामध्ये चैतन्याचं वातावरण असून याच अनुकूल वातावरणाचा लाभ उठवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.
१५-२० ऑक्टोबरदरम्यान विधानसभा निवडणूक होण्याचा अंदाज आहे. तसंच १५ सप्टेंबरच्या आसपास आचार संहिता लागण्याची शक्यता आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, ही कोणत्याही कार्यकर्त्याची इच्छा असते. पण मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरे आणि अमित शाह निर्णय घेतील. मुख्यमंत्री कोणाचा? अडीच-अडीच वर्ष का पाच वर्ष याचा निर्णय निवडणुकीनंतर होईल, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. प्रत्येक जागा निवडून आणण्यासाठी मेहनत घ्यायची आहे हे अमित शाह यांनी सांगितल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं.