योगेश खरे, झी मीडिया, मुंबई : जगभरात हाहाकार माजवणाऱ्या Coronavirus कोरोना विषाणूचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. त्यातच झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या चिंता आणखी वाढवत आहे. यामध्ये चाचणी, त्यानंतर कोरोनाचे नमुने तपासण्यासाठीच्या प्रयोगशाळांची कमी असणारी संख्या ही सुद्धा एक समस्या आहे.
मुंबईत असलेल्या सर्व खासगी आणि शासकीय प्रयोगशाळा मिळून दर दिवशी फक्त दोन हजार बाधितांची कोरोना तपासणीची क्षमता आहे. यामध्ये जेजे रुग्णालयाची क्षमता केवळ दोनशे वीस इतकीच आहे. ही क्षमता दुप्पट तिप्पट नव्हे तर थेट वीस पटीने वाढवण्याच काम नाशिकच्या दातार जेनेटिक्स ने केलं आहे.
थर्मो फीशर कॉन्ट स्टुडिओ मशीन ही जगातील दुर्धर कॅन्सरचं सर्वात अत्याधुनिक तपासणी करणारी मशीन आहे. एकावेळी आठ तासात दोन हजार सॅम्पल यामध्ये चेक होऊ शकतात . कुठल्याही ही तंत्रज्ञाशिवाय ही मशीन काम करते .
साडे तीन कोटी रुपयांची एकमेव अत्याधुनिक कॅन्सर तपासणीची स्वयंचलित लॅब भारतात केवळ नाशिकच्या दातार जेनेटिक्स कडे होती . या लाईफ मध्ये जगभरातून नमुने तपासणीसाठी येत असत . केंद्र सरकारच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेने सुद्धा इतकी अत्याधुनिक मशीन नाही, अशी ही लॅब दातार जेनेटिक्सने कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी जे जे रुग्णालयाला दिली आहे.
अत्याधुनिकतेने परिपूर्ण असणाऱ्या या लॅबमुळ जेजे रुग्णालयात रोजच्या तुलनेत वीस पटीने अधिक, तर संपूर्ण मुंबईत चार हजार नमुने अधिक तपासणी करता येणार आहे. यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये पसरणारा कोरोना नियंत्रित करणे सोपे होणार आहे.
दातार जेनेटिक्सकडून ही संपूर्ण अत्याधुनिक प्रयोगसाळा जेजे रुग्णालयात लावून दिली आहे. जी गुरुवारपासून कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. डॉक्टर राजन दातार यांनी मुंबईत झालेला कोरोना कहर पाहता राज्य सरकारला मदतीचा हात देत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.