मुंबई - मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वरून जाणाऱ्या देशांतर्गत प्रवाशांसाठी यापुढे बोर्डिंग पासवर सुरक्षिततेचा शिक्का असण्याची गरज असणार नाही. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या टर्मिनलवर सुरू करण्यात येणार आहे. अशा पद्धतीचा वापर करणारे मुंबई हे देशातील पहिलेच विमानतळ असणार आहे. नागरी विमान वाहतूक सुरक्षा विभागाकडून दिलेल्या सुचनांचा वापर करून या पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.
मुंबईतील टर्मिनल २ वरून प्रवास करणारे प्रवासी यापुढे बोर्डिंग पासची वैधता सिद्ध करण्यासाठी सुरक्षा कक्षाच्या अलीकडे ई-गेट रिडरचा वापर करू शकतील. स्वतःकडील मोबाईलच्या साह्याने बोर्डिंग पासवरील बारकोड किंवा क्युआर कोड स्कॅन करून या सुविधेचा वापर करता येईल. त्यानंतर सुरक्षा कक्षामध्ये जाऊन बोर्डिंग पासवर कोणताही शिक्का मारून घेण्याची गरज पडणार नाही. यामुळे विमानतळावरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांचे कामही कमी होईल. प्रवाशांना विमानात चढण्यासाठी आतमध्ये सोडण्यावर जास्त वेळ देण्यापेक्षा विमानतळावरील सुरक्षा आणखी कडक करण्यावर त्यांना लक्ष देता येईल.
विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना डिजिटलाजेशनचा अनुभव घेता यावा आणि विमानतळावर नवं तंत्रज्ञानाच्या दिशेने एक पाऊल टाकता यावे, यासाठी या पद्धतीचा वापर करण्यात येणार असल्याचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रशासनाने स्पष्ट केले. विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांचा विमानात चढण्यापर्यंतचा कालावधी कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्याचबरोबर यामुळे विमानतळावरी भल्या मोठ्या रांगेला कात्री बसेल. अगदी सहजपणे प्रवासी विमानतळावरील सर्व प्रक्रिया पूर्ण करू शकतील. मुंबईतील विमानतळावर प्रवाशांना स्वतःच चेक इन करता यावे, यासाठी विविध ठिकाणी टच स्क्रिन किऑस्क बसविण्यात आले आहेत.