मुंबई: 'अटलजींच्या हयातीत आम्ही जितके श्रीमंत होतो, तितके आता निर्धन झालेलो आहोत. त्यांच्या वेळी जितके आम्ही सामर्थ्यवान होतो, तितके आज असमर्थ झालेले आहोत. वाजपेयी हे संपूर्ण मनुष्य होते. ते आनंदयात्री होते. ते नवे नेहरू होते. वाजपेयी हे कठीण कोडे नव्हते. मुळात ते कोडे नव्हतेच', अशा शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्याप्रति आपल्या भावाना व्यक्त केल्या आहेत. वाजपेयी यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रांमधून आणि दिग्गजांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र सामनातून उद्धव ठाकरे यांनीही अटलजींबद्लच्या आपल्या भावना आणि स्नेह व्यक्त केला आहे. अत्यंत भावनाशिल शब्दांत आठवणी व्यक्त करत ठाकरे यांनी अटलजींचे स्वभाववैशिष्ट्य आणि कार्यपद्धीतींवर प्रकाश टाकला आहे. ठाकरे यांनी लेखात म्हटले आहे की, 'अटलजी अनंतात विलीन झाले. देश शोकमग्न आहे. नेते येतील नेते जातील. सत्तापदाच्या शपथग्रहणाचे सोहळे होतील, पण अटलजी पुन्हा निर्माण होणार नाहीत. अटलजींची भडकलेली चिता पाहिली आणि हा कसला दिवस उजाडला असे वाटले. अटलजी गेल्याने कोणी काय गमावले याचे हिशेब दिले गेले आहेत. कुणाचा आधार तुटलेला आहे. कुणी म्हणतो कोहिनूर हिरा गमावला आहे. कोण म्हणाले युगान्त झाला आहे; पण आम्ही म्हणतो, अटलजींचे स्वर्गारोहण हे शिवसेनाप्रमुखांप्रमाणे आहे. अटलजींच्या हयातीत आम्ही जितके श्रीमंत होतो, तितके आता निर्धन झालेलो आहोत. त्यांच्या वेळी जितके आम्ही सामर्थ्यवान होतो, तितके आज असमर्थ झालेले आहोत. वाजपेयी हे संपूर्ण मनुष्य होते. ते आनंदयात्री होते. ते नवे नेहरू होते. वाजपेयी हे कठीण कोडे नव्हते. मुळात ते कोडे नव्हतेच.
वाजपेयींनी त्यांच्या उदारमतवादाने आधी जनसंघाला, नंतर भारतीय जनता पक्षाला मोठे केले. कम्युनिस्टांनासुद्धा वाजपेयींविषयी ममत्व वाटे. कम्युनिस्टांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि भाजपविषयी टोकाचे विरोधी मत आहे, पण वाजपेयींचा विषय निघाला की ही ‘लाल फुले’ जास्त फुलतात. ते सांगू लागतात, ‘‘कोण, वाजपेयी ना? तो अगदी वेगळा माणूस आहे. ते उदारमतवादी आहेत. त्यांच्यात तो माथेफिरूपणा नाही म्हणून तर संघवाल्यांना वाजपेयी आपले वाटत नाहीत.’’ ‘जनसंघातील आपला माणूस’ असे वाजपेयींचे वर्णन करण्यापर्यंत कम्युनिस्टांची मजल गेली नाही तरी ते वाजपेयींविषयी ममत्वाने बोलत असतात. वाजपेयींचा हा उदारमतवाद सर्व पिढय़ांना आपलासा करणारा होता. ते सर्व घटकांत सहज मिसळत. सोशल मीडिया तेव्हा नव्हता. इलेक्ट्रॉनिक बातम्यांची माध्यमे नव्हती, पण वाजपेयी तरुणांचे हीरो होते, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.
'अटलजी अजातशत्रू होते. डोक्यावर ओझे घेऊन ते वावरले नाहीत. ते जगले व इतरांनाही जगू दिले. दुसऱयांच्या कर्तृत्वाची त्यांनी असूया बाळगली नाही. देशातील सर्वसमावेशक संस्कृतीची कास त्यांनी धरली. साश्रुनयनांनी, गलबललेल्या अंतःकरणांनी तमाम देशवासीयांनी अटलजींना शुक्रवारी निरोप दिला. गीतेत सांगितले ते खरे मानले तर ‘शस्त्रास्त्रांनी अशी माणसे कधीच मरत नाहीत. अग्नीने ती कधीच जळत नाहीत. पाण्याने ती कधीच भिजत नाहीत. वाऱयाने ती कधीच सुकत नाहीत’ असे हिंदुस्थानी तत्त्वज्ञान सांगते. अटलजींची यात्रा ही एका दिलदार, सत्त्वशील वीरपुरुषाची यात्रा होती. या वीरपुरुषाने जेवढे प्रेम गांधी, नेहरूंवर केले तितकेच प्रेम वीर सावरकरांवर केले', अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी अटलबिहारी यांच्याबद्धल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.