Uddhav Thackeray Shivsena Advice Modi Government: "भारतीय जनता पक्ष ज्यांना हिंदू हितरक्षक वगैरे मानत आहे, त्या नरेंद्र मोदी यांच्या काळातच हिंदू सगळ्यात जास्त असुरक्षित बनला आहे. देशातच नाही, तर जगातील अनेक भागांत हिंदूंवर हल्ले सुरू झाले आहेत. मंदिरात घुसून भक्तांना मारले जात आहे. कॅनडात ब्रॅम्पटन शहरात काल हिंदू मंदिरात खलिस्तानी घुसले व त्यांनी सशस्त्र राडा केला. मंदिरातील भाविकांना जबर मारहाण केली. त्यामुळे कॅनडातील हिंदूंमध्ये घबराट पसरली आहे. भारतातील मोदी सरकारसाठी हे एक आव्हान आहे," असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे. "कॅनडातील हिंदू अशा प्रकारे खतऱ्यात आला आहे व भाजपचे हिंदू हितरक्षक महाराष्ट्र-गुजरातच्या निवडणूक प्रचारात मुसलमानांविरुद्धच्या कामगिरीत गुंतून पडले आहेत. कॅनडातील हिंदूंचा संघर्ष हा मुसलमानांविरुद्ध नाही. तेथे ‘लव्ह जिहाद’, ‘व्होट जिहाद’ अशा गोष्टींना थारा नाही. तेथे हिंदूंच्या विरोधात शीख बांधव उभे ठाकले आहेत व त्यासाठी मोदी सरकारची फसलेली विदेश नीती कारणीभूत आहे," अशी टीका 'सामना'मधून करण्यात आली आहे.
"तुरुंगात असलेल्या एका गुन्हेगाराच्या मदतीने भारत सरकारने कॅनडातील काही शीख नागरिकांच्या हत्या केल्या. हे शीख कॅनडाचे नागरिक होते, असा आरोप आहे. "बाजूच्या बांगलादेशातही हिंदूंवर हल्ले सुरू आहेत. तेथेही मंदिरे तोडली, हिंदूंची पळापळ करण्यात आली. नेपाळातही हिंदू खतऱ्यातच आहे. अफगाणिस्तानातील हिंदूंनाही जगणे कठीण झाले आहे. म्हणजे मोदींच्या कार्यकाळात जगभरातला हिंदू खतऱ्यात आला आहे," असं लेखात म्हटलं आहे.
"खुद्द आपल्या भारत देशात कश्मिरी पंडितांची घर वापसी मोदी-शहा करू शकलेले नाहीत. कश्मीरच्या प्रत्येक दहशतवादी हल्ल्यात हिंदू समाजाचे शिरकाण सुरू आहे. मणिपुरातही हिंदूच मारला जात आहे व भाजपवाले पश्चिम बंगालात जाऊन ममतांविरोधात ‘हिंदू खतरे में’च्या गर्जना करीत आहेत. हे निव्वळ ढोंगच म्हणावे लागेल. काँग्रेस राजवटीत ‘इस्लाम खतरे में’च्या घोषणा होत असत. आता मोदी काळात ‘हिंदू खतरे में’ असे नारे लागत असतील तर मोदी व त्यांच्या लोकांना हिंदू हितरक्षक कसे म्हणायचे?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
नक्की वाचा >> 'अमित शाहांसंदर्भातील 'त्या' अफवेवर आमचा विश्वास नाही'; ठाकरेंची 'गुगली'! नेमकं प्रकरण काय?
"भारत व कॅनडातील संबंध आता साफ बिघडले आहेत व त्याचा फटका कॅनडातील हिंदूंना बसत आहे. कॅनडातील मंदिरात भाविकांना करण्यात आलेल्या मारहाणीचा पंतप्रधान मोदी यांनी निषेध व्यक्त केला, कृती मात्र शून्य! कॅनडाच्या सरकारने न्याय करावा आणि कायद्याचे राज्य कायम राखावे अशी आमची अपेक्षा असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. मोदी यांनी कॅनडात कायद्याच्या राज्याबाबत मार्गदर्शन केले, पण राजकीय स्वार्थासाठी स्वदेशात जातीय तणाव वाढेल व त्यास खतपाणी मिळेल अशाच भूमिका ते घेत आहेत," असा टोला ठाकरेंच्या पक्षाने लगावला आहे. "‘मुसलमान तुमची मंगळसूत्रे चोरतील’ इथपासून ते ‘मुसलमान घुसखोर तुमच्या पोरीबाळी पळवून नेतील’ असे दळभद्री भाष्य करण्यापर्यंत पंतप्रधानांची पातळी घसरली आहे. त्यामुळे ज्यांच्या देशात कायद्याचे राज्य उरले नाही ते कॅनडाला कायद्याचे राज्य कसे असावे, यावर मार्गदर्शन करीत आहेत," असा टोला ठाकरेंच्या पक्षाने लगावला आहे.
"देशात कायद्याचे राज्य नाही व हे लोक समान नागरी कायदा आणायला निघाले. म्हणजे यानिमित्ताने पुन्हा जातीय तणाव वाढवायचा, हिंदू-मुसलमान वाद करायचा व वाद चिघळल्यावर ‘हिंदू धोक्यात’, ‘हिंदू खतरे में’ अशी स्वतःच छाती पिटायची. ऐन दिवाळीत कॅनडातील हिंदूंवर हल्ले सुरू असताना मोदी सरकार गप्प बसले आहे. कॅनडातील हिंदूंना धीर देण्यासाठी व ‘बटेंगे तो कटेंगे’ हा संजीवनी मंत्र देण्यासाठी भाजपने व केंद्राने योगी आदित्यनाथ यांना कॅनडात पाठवायला हवे. भारतात हिंदू रक्षणाच्या गर्जना करण्यापेक्षा तिकडे कॅनडात खतऱ्यात सापडलेल्या हिंदूंना योगी व अमित शहांची जास्त गरज आहे," असा टोला लेखाच्या शेवटी लगावला आहे.