BMC Election 2022 : जाणून घ्या तुमच्या वॉर्डमधून कुणाचा पत्ता कट

मुंबई महापालिका निवडणुकीचा बिगुल येत्या काही दिवसांत वाजणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी ३१ मे रोजी प्रभागांच्या आरक्षणाची सोडत काढण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले.

Updated: May 31, 2022, 01:04 PM IST
BMC Election 2022 : जाणून घ्या तुमच्या वॉर्डमधून कुणाचा पत्ता कट title=

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने आज 31 मे रोजी आरक्षण सोडत काढली. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात ही सोडत काढण्यात आली.

ओबीसी आरक्षण वगळून महिला सर्वसाधारण, महिला अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राखीव असलेल्या प्रभागांसाठी ही सोडत निघत असून यात मात्तबर नगरसेवकांचे वॉर्ड राखीव झाले आहेत. तर काही राखीव वॉर्ड खुले झाले आहेत.

माजी महापौर किशोरी पेडणेकर, राखी जाधव यांना दिलासा

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आरक्षण सोडतीत दिलासा मिळाला आहे. त्यांचा प्रभाग क्रमांक 206 हा सर्वसाधारण झाला आहे. तर, राष्ट्रवादीच्या माजी गटनेत्या राखी जाधव यांनाही दिलासा मिळाला आहे. त्यांचा वॉर्ड क्रमांक 130 हा महिलांसाठी राखीव झाला आहे

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना धक्का

शिवसेना उपनेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना या सोडतीत धक्का बसला आहे. यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाची धाड पडली त्यानंतर नुकतीच त्यांना ईडीने समन्स पाठविले होते. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या यशवंत जाधव यांना या सोडतीतून आणखी एक धक्का बसलाय. यशवंत जाधव यांचा 217 क्रमांक वार्ड सर्व साधारण महिलासाठी आरक्षित झाला आहे. 

माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचाही 96 हा प्रभाग महिलांकरता राखीव झाला आहे. तर, भाजप जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक सुषम सावंत यांचा प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आहे. 

आजच्या सोडतीनुसार बेस्टचे माजी अध्यक्ष आशिष चेंबुरकर आणि भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांचे वॉर्ड अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहेत. तर, शिवसेना नगरसेवक आरोग्य समिती माजी अध्यक्ष अमेय घोले, काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित झालेत. 

अनुसूचित जातीसाठी राखीव झालेले वॉर्ड

60, 153, 157, 162, 208, 215 आणि 221

अनुसुचित जाती महिलांसाठी राखीव

85, 107, 119, 139, 165, 190, 194, 204

अनुसूचित जमातीसाठी राखीव झालेले वॉर्ड

55 आणि 124 हे दोन वॉर्ड अनुसूचित जमातीसाठी राखीव झालेत