मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात शाळा महाविद्यालयं बंद आहेत. राज्यात कोरोनाचा आलेख काहीसा कमी होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालयं उघडण्यासंदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मोठी घोषणा केली आहे.
उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदे घेत महाविद्यालयं सुरु करण्याबाबत आणि सीईटी परीक्षेबाबत (CET Exam) माहिती दिली. राज्यातील महाविद्यालयं 2 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा मानस असून ऑफलाईन की ऑनलाईन याचा निर्णय त्यावेळच्या परिस्थितीनुसार घेतला जाईल अशी माहिती उद्य सामंत यांनी दिली.
सीईटी परीक्षा झाल्यानंतर महाविद्यालयं सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती उद्य सामंत यांनी दिली आहे. सीईटी परीक्षेच्या तारखाही सामंत यांनी यावेळी जाहीर केल्या. यावर्षी सीईटीला एकूण 8 लाख 55 हजार 869 विद्यार्थी बसणार आहेत. मागच्या वर्षी सीईटीची 197 केंद्रे होती. यावर्षी त्यात वाढ झाली असून 226 केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने यंदा ही परीक्षा घेतली जाणार आहे. 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत ही सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.