मुंबई : नालासोपाराच्या राजोडी समुद्रकिनारी गेल्या आठवड्यापासून डॉल्फिन माशांचा कळप दिसतो आहे. अशाप्रकारचे हे डॉल्फीनचे कळप गोव्याच्या समुद्रकिनारी आढळून येतात. मात्र नालासोपाराच्या समुद्रकिनारीही डॉल्फीन आढळून आल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. जेट्टीवरून समुद्राचे जीवरक्षक जात असताना समुद्राच्या मध्यभागी डॉल्फीनचा कळप त्यांना दिसला. कर्मचा-यांनी आपल्या कॅमेरात या डॉल्फीनला टिपलं. डॉल्फीनचा सात ते आठ जणांचा हा झुंड होता. पाण्यात तो मुक्तपणे संचार करत होता. डॉल्फीन्स नेहमी स्वच्छ समुद्राच्या पाण्यात वावरतात. नालासोपाराच्या राजोडी समुद्रकिनारी डॉल्फीन्स आढळल्याने नागरीकही आनंदात आहेत.
डिसेंबर ते एप्रिल हा प्रजननाचा कालावधी असल्याने डॉल्फीन खोल समुद्रातून किनाऱ्यावर येतात. या कालावधीत कोकणात देखील पर्यटक डॉल्फिन पाहण्यासाठी येतात. पाण्यात उडी घेताना त्यांना पाहणं एक वेगळाच आनंद असतो. मासा हा प्रजातीतला नसून पाण्यात राहणारा सस्तन प्राणी आहे. मानवासारखाच डॉल्फिन हा सामाजिक प्राणी आहे. १० ते १२ जणांच्या कळपामध्ये डॉल्फिन राहतो. परिस्थिती आणि अन्नाची उपलब्धता यानुसार त्यांचा कळप हजारापर्यंत देखील जाऊ शकतो.