दीपक भातुसे, झी मराठी, मुंबई : 'पार्थ अपरिपक्व आहेत, माझ्या नातवाच्या मताला मी कवडीचीही किंमत देत नाही,' अशा शब्दात शरद पवारांनी पार्थ पवार यांना फटकारलं होतं. आजोबांचे हे शब्द पार्थ पवार यांच्या चांगलेच जिव्हारी लागले. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. आजोबा शरद पवार यांच्या वक्तव्याने दुखावलेल्या पार्थ पवार यांच्याशी काल रात्री सुप्रिया सुळे यांनी चर्चा केली होती. मात्र अद्याप पार्थ पवारांची पुढील भूमिका ठरलेली नाही.
याबाबत पार्थ पवार कुटुंबातील इतर सदस्यांशीही चर्चा करणार आहेत. पार्थ पवार हे आपल्या सर्व काका आणि आत्यांशी चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती मिळाली आहे. पार्थ आपले काका जयंत पवार, श्रीनिवास पवार, अभिजित पवार यांच्याशी आणि त्यांच्या आत्यांशी चर्चा करणार असून पुढील निर्णय घेणार आहेत. आपले आजोबा शरद पवार यांच्या विधानामुळे दुखावले गेलेले पार्थ अद्यापही अस्वस्थ असल्याची माहिती मिळत आहे.
साडेसात वाजण्याच्या सुमारास पार्थ पवार हे सिल्व्हर ओकला गेले आणि बंद दाराआड या कुटुंबियांमध्ये बरीच चर्चा झाली. सव्वा दोन तासानंतर पार्थ पवार बंगल्याबाहेर आले, पण त्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
बुधवारी सिल्व्हर ओक बंगल्यावर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा झाली होती. ती बैठक संपल्यानंतर अजित पवारही प्रतिक्रिया न देता बाहेर पडले होते. सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांना सिल्व्हर ओकवर बोलावलं होतं. सिल्व्हर ओकवर सुप्रिया सुळे यांच्यासोबतच शरद पवारही होते.