मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे. शिवसेनेला वाचवण्यासाठी रश्मी ठाकरे मैदानात उतरल्या आहेत. रश्मी ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या पत्नींशी संपर्क साधला आणि त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत येण्याची सूचना केली.
मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमदारांच्या पत्नींनीही रश्मी ठाकरे यांना सुनावलं आहे. आमदार पतींवर होत असलेल्या अन्यायाचा पाढाच त्यांनी रश्मी ठाकरेंसमोर वाचल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर हळूहळू आणखी काही आमदार त्यांच्यासोबत जोडले गेले. शिवसेनेचे 38 आमदार शिंदे गटात शामिल झाले. तर काही अपक्ष आमदार देखील त्यांच्यासोबत आहेत.
शिवसेना बंडखोरांच्या विरोधात आक्रमक झाली आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरु आहेत. बंडखोरांच्या कार्यालयांवर आंदोलन केली जात आहे. त्यांची बॅनर फाडली जात आहेत.
शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. 55 पैकी 38 आमदार पक्ष नेतृत्वाच्या विरोधात गेले आहेत. राष्ट्रवादी-काँग्रेससोबत असलेल्या सत्तेतून बाहेर पडण्याची मागणी शिंदे गटाची आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा भाजपसोबत जुळवून घेऊन सत्ता स्थापन करण्याची मागणी त्यांची आहे.
शिवसेना पक्षप्रमुखांकडून यानंतर आता बैठकांचा धडाका सुरु झाला आहे. जिल्हाप्रमुख, नगरसेवकांसोबत बैठका घेतला गेल्या. महाविकासआघाडीच्या ही बैठका सुरु आहेत. सरकार वाचवण्यासाठी शरद पवारांकडून देखील प्रयत्न सुरु झाले आहेत.