मुंबई : कोरेगाव भीमामध्ये उसळलेल्या दंगलीला आठवडा पूर्ण झाला. याप्रकरणी पाच आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी अटक केलीय. मात्र आठवडा उलटला तरी दंगलीच्या ख-या सूत्रधारांपर्यंत पोलीस पोहोचू शकलेले नाहीत.
पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात नववर्षाची सुरूवात झाली तीच जातीय दंगलीनं... कोरेगाव भीमामध्ये वादाची ठिणगी पेटली. दोन समाजात तोडफोड, जाळपोळ झाली.
या दंगलीत कोट्यवधींचं नुकसान झालं. पोलिसांसह कित्येक जण जखमी झाले. राहुल फटांगरे नावाच्या निरपराध तरूणाचा हकनाक बळीही गेला. या घटनेचे पडसाद अर्थातच राज्यभर उमटले.
प्रकाश आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलं. यानिमित्तानं पुन्हा एकदा मनं दुभंगली गेली.
दंगलीची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची भेटही घेतली. परंतु अजूनही न्यायाधीशांच्या नावाची घोषणा झालेली नाही.
बंद काळात मालमत्तेची नासधूस केल्याबद्दल हजारो आंदोलकांवर गुन्हे नोंदवण्यात आले. त्यातल्या शेकडो लोकांना अटकही झाली. पण कोरेगाव भीमाची मूळ दंगल ज्यांच्यामुळं भडकली, ते अजूनही मोकाटच आहेत.
खरं तर वढू बुद्रुकमध्ये निर्माण झालेला वाद 31 डिसेंबरलाच मिटला होता. पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत दोन्ही गटांनी वाद मिटल्याचं उभयपक्षी मान्य केलं. परस्परांवर दाखल गुन्हे मागे घेतले.
मग 1 जानेवारीची दंगल कुणामुळं भडकली, हा प्रश्न कायम राहतो. यामागे बाह्य शक्तींचा हात असल्याचं सांगितलं जातंय.
जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषणं करण्यात आली. त्यामुळं कोरेगाव भीमामध्ये दंगल उसळल्याचा आरोप करण्यात आला. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तर कोरेगाव भीमा दंगलीमागं शिवजागर प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरूजी आणि समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.
भिडे गुरूजी आणि एकबोटेंवर गुन्हाही दाखल झाला. मात्र या दोघांनीही आरोपांचा इन्कार केलाय. आता आठवडा उलटला तरी पोलिसांनी याप्रकरणी काहीच कारवाई का केली नाही, असा सवाल उपस्थित होतोय.
कोरेगाव भीमा दंगलीमुळं महाराष्ट्रातील समाजमन ढवळून निघालंय. आठवडा उलटला तरी ना चौकशी समिती जाहीर झालीय, ना ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, त्यांना अटक झालीय. त्यामुळं दंगल कुणी घडवली, याचा शोध घेताना पोलीस आणि सरकारची चांगलीच कसोटी लागणार आहे.