मुंबई : म्हाडातील घरांसाठी अर्ज करण्यासाठी २४ ऑक्टोबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता संपत आली असून आज नोंदणीचा शेवटचा दिवस आहे. सोमवार, २४ ऑक्टोबरपर्यंत म्हाडा घरांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. त्यामूळे मुदत संपेपर्यंत म्हाडाकडे किती इच्छुकांची नोंदणी होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.
रविवार संध्याकाळपर्यंत म्हाडाच्या घरांसाठी सुमारे ६० हजार ९२३ इच्छुकांनी नोंदणी केली होती. पण रात्रीपर्यंत साधारण ३७ हजार इच्छुकांनीच घरांसाठी प्रत्यक्ष पैसे भरले आहेत. त्यामूळे घरांची अपुरी संख्या व प्रचंड वाढलेल्या किमतीमुळे यंदाच्या म्हाडाच्या लॉटरीतील घरांना मुंबईकरांनी अतिशय थंड प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी म्हाडाच्या घरांसाठी सुमारे एक लाख ३५ हजार अर्ज आले होते. यंदा एका लाखाच्या आसपास अर्ज येतील, असा म्हाडाला विश्वास होता. पण अर्जाच्या संख्येने ५० हजाराचा आकडाही पार न केल्याचे सध्याचे चित्र आहे.
प्रत्यक्ष पैसे भरण्यासाठी अजून दोन दिवसांची मुदत असल्याने अर्जदारांची संख्या वाढेल असा म्हाडाला विश्वास आहे.
नोंदणीकृत अर्जदाराला नोंदणीतल्या माहितीत २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत बदल करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज दि. २४ ऑक्टोबरला रात्री ११ वाजून ५९ मिनिटापर्यंत सादर करता येणार आहे.