मुंबई : राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (Maharashtra Assembly Budget Session 2021 Start Today) सुरू होत आहे. हे अधिवेशन सुरू होण्याअगोदरच कोरोना चाचणी केलेल्या अहवालात २३ पोलीस आणि २ पत्रकार पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. (23 police, 2 Journalist found Corona Positive) अधिवेशनाअगोदर ३२०० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र अनेक आमदार आणि मंत्र्यांनी बाहेर चाचणी केली असून त्यांचे अहवाल कळू शकलेले नाहीत.
राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात अनेक विषय विरोधक उचलून धरतील अशी शक्यता आहे. संजय राठोड प्रकरणापासून अनेक मुद्यांवर विरोधक या अधिवेशनात आक्रमक होणार असल्याने हे अधिवेशन वादळी ठरणार आहे. संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण विरोधक अधिवेशनात लावून धरणार आहेत.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल अभिभाषण, शोकप्रस्ताव असले तरीही कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधक सरकारविरोधात विविध मुद्यांवर विधानभवनात आंदोलन करण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन असूनही हे अधिवेशन १० दिवस एवढ्या कमी कालावधीचे होणार असल्याने कामकाजापेक्षा गोंधळच या अधिवेशनात दिसण्याची शक्यता आहे.