मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील युतीसंदर्भात भाजप आणि शिवसेना अजूनही कोणत्या निर्णयावर पोहचू शकलेले नाहीत. मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी अर्थात 'वर्षा' बंगल्यावर चर्चा सुरू होती. जवळपास तीन तास या बैठकीत विविध विषयांवर खल सुरू होता. यावेळी, शिवसेना-भाजप युती आणि आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांवर चर्चा झाली. या बैठकीसाठी चंद्रकांत दादा पाटील, सुभाष देशमुख, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील उपस्थित होते.
एकूण २८८ जागांपैंकी ५० टक्के जागा आपल्याला मिळाव्यात अशी अट शिवसेनेनं भाजपापुढे ठेवलेली आहे. परंतु, अद्यापही १० जागांवरून दोन्ही पक्षांत एकमत होत नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. उल्लेखनीय म्हणजे, २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदानाला आता महिनाही उरलेला नाही.
एकूण जागा - २८८
भाजपा - १२२
शिवसेना - ६३
काँग्रेस - ४२
राष्ट्रवादी काँग्रेस - ४१
इतर - २०
अद्याप युतीची घोषणा झालेली नाही. त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसणार आहे. नवी मुंबईतल्या माथडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आणि वडार भवनला सदिच्छा भेट देण्यासाठी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहे. त्यामुळे युतीबाबत दोघं काही बोलणार का याकडे लक्ष लागलेलं आहे.