मुंबई : मान्सून अखेर गोव्याच्या वेशीवर धडकलाय. पावसासाठी लागणारे अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे पुढच्या २४ तासांमध्ये मान्सून तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कुलाबा वेधशाळेनं हा अंदाज वर्तवतलाय. मान्सूनची आगेकूच अशीच सुरु राहिली तर १३ जूनपूर्वीच मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. या संदर्भात कुलाबा वेधशाळेचे उप महासंचालक के एस होसाळीकर यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितले, सध्या वातावरण चांगले आहे. त्यामुळे पाऊस पुढच्या आठवड्यात संपूर्ण राज्यात दाखल होईल.
दरम्यान, शुक्रवार, शनिवारी गोव्यासह पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता गोव्याच्या हवामान खात्यानं वर्तवली आहे. मुंबईत काल रात्रीपासून पाऊस बऱ्यापैकी बरसत आहेत. राज्यातही पाऊस सक्रीय होत आहे. त्यामुळे या पावासाचा राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
मान्सून राज्याच्या वेशीपाशी आल्याची चाहूल मध्यरेल्वेच्या प्रवाशांना सकाळी सकाळी लागलीय. दादरमध्ये डाऊन धीम्या मार्गावर वाहतूक विस्कळीत झालीय. डाऊन मार्गावर एका लोकलमध्ये बिघाड झाल्यानं वाहतूकीवनर परिणाम झालाय.