मुंबई : विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडणूक प्रक्रियेला विरोध करणारी याचिका भाजपा आमदार गिरीश महाजन आणि जनक व्यास यांनी दाखल केली आहे यावर आज मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणात कुरघोडी सुरू आहेत. एकमेकांवर आरोपांच्या सातत्याने फैरी झडत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत मत नोंदवताना म्हटले की, राज्यातील मुख्यमंत्री आणि राज्यपाल ही पदं सोबत काम करीत नाहीत. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचा एकमेकांवर विश्वास नाही, हे दुर्देव आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेचं नुकसान होत आहे.
राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी एकत्र बसून आपल्यातील मतभेद, वाद मिटवायला हवेत... कारण याचा परिणाम राज्याच्या कारभारावर होत आहे. यामुळे राज्याचा कारभार सकारात्मकरित्या पुढे जाताना दिसत नाही असे उच्च न्यायालयाने म्हटले.
आमदार गिरीश महाजन यांच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल भगतसिंह कोशारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वादावर नाराजी व्यक्त केली आहे.
विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी आवाजी मतदान व्हावे असे महाविकास आघाडीचे म्हणणे आहे तर, हे मतदान गुप्त पद्धतीने व्हावे यासाठी गिरीश महाजन यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे तिखट शब्दात कान टोचले आहेत. गिरीश महाजन आणि जनक व्यास यांच्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत.