मुंबई : महाराष्ट्र सुरक्षा दलातील मेट्रोमधील कार्यरत असलेले जवान आजपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे मेट्रोच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र सुरक्षा दलात महिला आणि पुरुष कार्यरत असून विविध मांगण्यांसाठी सरकारशी बोलणी सुरू आहेत. पण मागील 7 वर्षापासून या सुरक्षा रक्षकांना कायम स्वरूपी नोकरीत सामावून घेतलेलं नाही. त्याचप्रमाणे पोलीस म्हणून त्यांना सेवेत दाखल केले असले तरी पोलिसांचा कोणताच दर्जा मिळत नसल्याची तक्रार यासुरक्षा रक्षकांनी केली आहे.
घाटकोपर मेट्रो स्टेशनवर सकाळी सुरक्षा रक्षक कामावर न आल्याने मेट्रोला खासगी सुरक्षा रक्षकांना कामावर बोलवावे लागले आहे. सकाळी गर्दीच्या वेळी सुरक्षा चाचणी होण्यास वेळ होत असल्याने प्रवाशांच्या मोठ्या रांगा पहावयास मिळत होत्या. रांगा वाढत असल्याने मग सुरक्षा ना करताच प्रवाश्याना मेट्रोत प्रवेश दिला गेला आहे. त्यामुळे एकीकडे लंडन येथे भुयारी मेट्रोत बॉम्बस्फोट झाल्यामुळे मेट्रोची सुरक्षा वाढवण्याची गरज असतांना मुंबईच्या मेट्रोत मात्र विना सुरक्षाच प्रवाशी प्रवास करीत आहेत.