Mumbai Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवाला आता अवघे काहीच दिवस शिल्लक असताना बऱ्याच मोठ्या गणेशोत्सव मंडळांची लगबग सुरु झाली आहे. बाप्पाच्या मूर्ती मंडपांमध्ये येण्यासही सुरुवात झाली आहे. 10 फुटी, 20 फुटी अशा महाकाय मूर्ती मंडपांच्या दिशेनं रवाना होत आहेत. सर्वत्र उत्साहाचं वातावरणही पाहायला मिळत आहे. असं असतानाच मुंबईकरांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासन करताना दिसत आहे. ऐन उत्सवाच्या दिवसांमध्ये असा इशारा का, हाच प्रश्न तुम्हालाही पडतोय ना?
लाडक्या बाप्पाची मूर्ती मंडपामध्ये नेत असताना मोठ्या प्रमाणात गर्दी होते. आगमन मिरवणुकांमध्ये रस्तेच्या रस्ते वाहतुक खोळंबते आणि ही गर्दी क्षणाक्षणाला वाढतच जाते. पण, इथंही धोका नाकारता येत नाही.
सध्याच्या घडीला मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी अर्थात मोठ्या मूर्ती साकारल्या जाणाऱ्या लालबाग परळ भागातील चित्रशाळांमधून शनिवार, रविवारी तुलनेनं जास्त गणेश मूर्ती मंडपांची वाट धरतात. मात्र या आगमन सोहळ्यांच्या मार्गावरील तब्बल 13 पूल धोकादायक असल्याची बाब नुकतीच समोर आली आहे. या पुलांवरून मूर्ती घेऊन जात असताना काळजी घ्यावी तिथं जास्त वेळ थांबू नये असा इशारा पालिकेच्या पूल विभागाकडून नागरिक आणि गणेशोत्सव मंडळांना देण्यात आला आहे. पुलांच्या या यादीत सर्वाधिक रेल्वे ब्रिजचा समावेश आहे.
बहुतांशी रेल्वे पुलांवरून मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक आणि त्यावरून मिरवणुकांची ये-जा. अचानक वाढणारी गर्दी पाहता धोक्याची कोणतीही परिस्थिती उदभवू नये यासाठी आता प्रशासनानं नागरिकांना सतर्क करण्याची सुरुवात केली आहे.