गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई: पैशांची गरज असलेल्या गरीब कुटुंबांना पकडून त्यांचे मूल हे दत्तक घेतो, असे सांगून ते परस्पर जास्त पैशात विकणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये मूल विकत घेणाऱ्या जोडप्याचा आणि चार महिलांचा समावेश आहे. हे दोघेही मूल विकत घेण्यासाठी आले होते. त्यावेळी अंधेरी युनिट सहा गुन्हे शाखेने सापळा रचून या सर्वांना ताब्यात घेतले.
हॉस्पिटलची संबंधित असणाऱ्या अनेक ठिकाणी काम करणाऱ्या चार महिला आरोपींनी एक टोळी बनवली होती. या टोळीच्या माध्यमातून पैशांची गरज असलेल्या पालकांना शोधून त्यांचे मूल हे दुसऱ्यांना दत्तक द्यायचा धंदा त्यांनी सुरु केला होता. सुरुवातीला पालकांना दर महिन्याला मुलांची सुरक्षितता पाहता येईल, असे सांगून त्यांची मनधरणी करण्यात आली. मात्र, तीन वर्षांपूर्वी दत्तक पद्धतीने विकलेल्या पालकांना आपल्या मुलाला एकदाही न पाहता आल्याने त्यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी अगदी शिताफीने तपास करत या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सुनंदा बिका मसाले सविता मंगेश साळुंखे, भाग्यश्री कदम, आशा उर्फ ललिता जोसेफ, या आरोपी महिलांनी एक टोळी बनवली होती. त्या गेल्या तीन वर्षांपासून नवजात बालकांची विक्री करण्याचे काम करत होत्या. पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडीला नवजात बालकांची सुटकाही करण्यात आली आहे.