सचिन गाड, मुंबई : वयाच्या दुसऱ्या महिन्यापासून मुंबई पोलिसात दाखल झालेली हिना नावाची पोलीस श्वान निवृत्त होते आहे. आपल्या १० वर्षांच्या सेवेत हिनानं अनेक महत्वाच्या गुन्ह्यांचा छडा लावलाय.
हिना ही मुंबई पोलिसांच्या श्वान पथकाची शान. गेल्या १० वर्षांत अनेक गुन्ह्यांचा छडा लावणारी हिना आता निवृत्त होतेय. २४ जानेवारी २००८ ला हिनाचा जन्म झाला. केवळ दोन महिन्यांची असताना मुंबई पोलिसांच्या श्वान पथकात ती दाखल झाली. तेव्हापासून आजपर्यंत पोलीस श्वान ही पदवी हिनानं अगदी लिलया पेलली.
गेल्या दहा वर्षात हिनानं अनेक गुन्ह्यांचा छडा लावला. काही वर्षांपूर्वी भोईवाडा परिसरात फुटपाथवर झोपलेल्या एका तरूणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आला होती. घटनास्थळी कुठलाही पुरावा नव्हता. हिनाला घटनास्थळी नेताच तिनं अवघ्या काही मिनिटांत आरोपीचा छडा लावला. कुर्ल्याच्या नेहरू नगरमध्ये लहान मुलींच्या हत्या आणि बलात्काराच्या प्रकरणाचा छडा लावण्यात देखील हिनाचा वाटा मोलाचा होता.
उमेश सापते आणि विकास शेंडगे यांनी हिनाचे हँडलर म्हणून काम पाहिलं. गेल्या १० वर्षांपासून हिनाचा त्यांना चांगलाच लळा लागला होता. त्यामुळे निवृत्तीनंतरही तिची मुंबई पोलिसांच्या श्वान पथकातच देखभाल केली जाणार आहे.