मुंबई : चेंबूर सामूहिक बलात्कारप्रकरणी राष्ट्रवादीने चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढला. सुप्रिया सुळेंसह शेकडो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या मोर्चात सहभाग घेतला. राष्ट्रवादीने जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चा चुनाभट्टी पोलीस स्टेशनवर पोहोचला असता पोलिसांनी सुप्रिया सुळेंना पोलीस स्टेशनबाहेर अडवलं. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले. मुंबईमध्ये सामूहिक अत्याचाराला बळी पडलेल्या मूळच्या जालना येथील तरूणीच्या मृत्यूप्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल द्या आणि आरोपींना तातडीने अटक करा, अशा सूचना आयोगाने मुंबई पोलिसांना दिल्या आहेत.
दरम्यान या प्रकरणी राज्य महिला आयोग उशीरा जागं झालं आहे. महिला आयोग झोपला होता का असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारला आहे. चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्कार प्रकरणी ठोस पुरावे मिळत नसून लवकरच आरोपीला पकडू असा दावा पोलिसांनी केला आहे.
बलात्कार झालेल्या तरुणीच्या नातेवाईकांनी आरोपी मोकाट असून पोलीस त्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप केला होता. आरोपीचे नाव देऊनसुद्धा पोलीस आरोपीला अटक करत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. यावर पोलिसांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. याप्रकरणी चुनाभट्टी पोलीस ठाण्याबाहेर सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करीत आहेत. एक महिन्यापूर्वी १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या तरुणीचा औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला.