मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या संपादपकपदी रश्मी ठाकरेंची नेमणूक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 'सामना'चे संपादकपद सोडल्यानंतर ते पद रिक्त होते. आता त्या पदावर उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Maharashtra CM and Shiv Sena leader Uddhav Thackeray's wife Rashmi Thackeray named the new editor of Shiv Sena mouthpiece Saamana. (file pic) pic.twitter.com/6DEOEU6gVB
— ANI (@ANI) March 1, 2020
बाळासाहेब ठाकरे हे 'सामना'चे संस्थापक आणि पहिले संपादक होते. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर संपादकपदाची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे आली आणि आता उद्धव ठाकरे यांनीही हे पद सोडल्यानंतर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे 'सामना'च्या संपादकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांनी संपादक पद सोडल्यानंतर कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याकडे 'सामना'ची संपूर्ण जबाबदारी होती. तेच यापुढे 'सामना' चालवतील अशी शक्यता होती मात्र अनपेक्षितपणे रश्मी ठाकरे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. आजच्या 'सामना'च्या प्रिंट लाईनमध्ये संपादक म्हणून रश्मी ठाकरे यांचा उल्लेख करण्यात आला आहे तेव्हा ही बाब समोर आली.
'सामना' म्हणजे 'शिवसेना' आणि 'शिवसेना' म्हणजे 'सामना' असंच एक समीकरण आहे. अनेकदा शिवसेनेने आपली भूमिका 'सामना'मधून मांडली आहे. तसेच अनेक विषयांवर सामनांची भूमिका काय? हे वाचण्याची वाचकांना उत्सुकता असते.