मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना सर्व प्रकारची कर्जे येत्या एक ऑक्टोबरपासून रेपो रेटशी जोडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे गृह, वाहन कर्जदार तसेच लघूउद्योगांना स्वस्तातील कर्ज उपलब्ध होणार आहेत. कर्जांवर मनमानी व्याजदार आकारणाऱ्या बँकांवर त्यामुळे निर्बंध येतील. प्रमुख व्याजदरात वेळोवेळी कपात होऊनही त्याचा लाभ प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात आखडता हात घेणाऱ्या बँकांवर अखेर सक्तीचा बडगा उगारला आहे.
रेपो दर कमी करूनही व्यापारी बँकांकडून हा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवला जात नव्हता. याबाबत खुद्द गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अनेकदा खंत व्यक्त केली होती. चालू वर्षांत रिझव्र्ह बँकेने १.१० टक्के रेपो दर कमी करूनही व्यापारी बँकांनी मात्र तुलनेत केवळ ०.४० टक्के दर कपातच केली आहे. स्टेट बँकसारख्या निवडक काही बँकांनीच आतापर्यंत रेपो दराशी निगडित कर्ज व्याजदर सुविधा दिली आहे.
त्यामुळे वाहन, लघू उद्योगांसाठीही रेपो दराशी संलग्न व्याजदर उत्पादने असावीत, असे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे रेपो दर बदलाचा थेट लाभ कर्जदारांना होईल. ऑक्टोबर महिन्यातच दसरा आणि दिवाळी सारखे महत्त्वाचे सण असल्याने ऐन सणांच्या तोंडावर स्वस्त कर्जाची भेट कर्जदारांना मिळणार आहे.
केवळ मोजक्याच बँकांनी रेपो रेटप्रमाणे आपल्या व्याजदरात कपात केली आहे.
स्टेट बँक ८.०५%
बँक ऑफ बडोदा ८.३५%
आयसीआय. बँक ८.५५%
अॅक्सिस बँक ८.५५%
एचडीएफसी बँक ८.६०%