सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर शरीफुल बांगलादेशला पळून का गेला नाही? खरं कारण आलं समोर, 'जास्त पैसे...'

Saif Ali Khan Stabbing: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला केल्यानंतर हल्लेखोर शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमिन फकिर याने पळून जाण्याची योजना आखली होती. पण तो त्यात यशस्वी होऊ शकला नाही.   

शिवराज यादव | Updated: Jan 22, 2025, 04:46 PM IST
सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर शरीफुल बांगलादेशला पळून का गेला नाही? खरं कारण आलं समोर, 'जास्त पैसे...' title=

Saif Ali Khan Stabbing: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा चाकूहल्ला करणाऱ्या  हल्लेखोर शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमिन फकिरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दरम्यान हल्ल्यानंतर शरीफुलची बांगलादेशात पळून जाण्याची योजना होती. शरीफुलने 16 जानेवारीला सैफ अली खानच्या घरी चोरी करण्याच्या उद्देशाने घुसखोरी केली होती. यावेळी त्याने पळून जाताना सैफ अली खानवर चाकूने वार करत त्याला जखमी केलं होतं. 

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हल्ल्यानंतर फकीरचा पश्चिम बंगालमधील हावडा येथे पळून जाण्याची योजना होती. यानंतर तेथून तो बांगलादेश गाठणार होता. पण पोलीस आपल्या शोधात असल्याचं लक्षात आल्यानंतर त्याची योजना सत्यात उतरु शकली नाही. त्याने घाईत हावडाला जाण्यासाठी ट्रेनचं तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला. पण इतक्या लवकर तिकीट हवी असल्याने ट्रॅव्हल एंजट जास्त पैशांची मागणी करत होते. 

रक्तबंबाळ अवस्थेतील सैफ अली खानला मदत करणाऱ्या रिक्षाचालकाला किती बक्षीस मिळालं माहितीये?

 

शरीफुल तिकीट मिळवण्याच्या आधीच मुंबई पोलिसांनी ठाण्यात त्याला गाठलं आणि अटक केली. दरम्यान मुंबई पोलीस शरीफुल ज्या ट्रॅव्हल एजंट्सच्या संपर्कात होता त्या सर्वांची माहिती घेत आहेत. हाय प्रोफाईल प्रकरण असल्याने पोलीस या सर्व एजंट्सची चौकशी करणार आहेत. 

सैफ अली खानचा हल्लेखोर भारतात कसा घुसला? नदी ओलांडून मेघालय गाठलं, बंगालमध्ये जाऊन...; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे

 

मंगळवारी सैफ अली खानला लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. चाकू हल्ला झाल्यानंतर त्याला उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याच्यासोबत त्याची पत्नी, अभिनेत्री करीना कपूर देखील होती. 

हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात पाच तासांची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि नंतर त्याला आयसीयूमध्ये हलवण्यात आले. अभिनेत्याच्या शरीरातून चाकूचा एक तुकडा काढण्यात आला. अभिनेत्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की तो गंभीर दुखापतींपासून वाचला आहे हे त्याचं सुदैव आहे.

डॉक्टरांनी त्याला आठवडाभर विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे आणि संसर्ग टाळण्यासाठी कोणीही भेटू नये असं सांगितले आहे. त्याच्या वांद्रे येथील घरी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.