सैफ हल्ला प्रकरणात सर्वात मोठी अपडेटः छत्तीसगडमध्ये सापडला हल्लेखोर? एका चुकीमुळे आला तावडीत

Saif Ali Khan Attacker: 

Pravin Dabholkar | Updated: Jan 18, 2025, 07:33 PM IST
सैफ हल्ला प्रकरणात सर्वात मोठी अपडेटः छत्तीसगडमध्ये सापडला हल्लेखोर? एका चुकीमुळे आला तावडीत title=
संशयित आरोपी

Saif Ali Khan Attacker: सैफ अली खान याच्या घरी घूसून त्याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचा मुंबई पोलिस तपास करत आहेत. यासाठी मुंबई पोलिसांनी 20 पथकं तयार केली आहे. सैफच्या बंगल्यातील सीसीटीव्हीत कैद झालेला फोटो सगळीकडे पाठवण्यात आलाय. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान छत्तीसगड येथून आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. गोंदिया-राजनांदगाव दरम्यानच्या रेल्वे प्रवासात या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या एका चुकीमुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय अधिक बळावला.

आरपीएफ पोस्ट दुर्गच्या निरीक्षकांना जुहू पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांकडून दुपारी 12 वाजून 24 मिनिटांनी संशयिताबद्दल माहिती मिळाली. सैफ अली खानवरील हल्ल्यातील संशयिताचा फोटो आणि मोबाईल टॉवरचे स्थान माहितीमध्ये देण्यात आले होते. संशयित व्यक्ती 12101 जनेश्वरी एक्सप्रेसने प्रवास करत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.

माहिती मिळाली त्यावेळी ट्रेन गोंदिया आणि राजनांदगाव स्थानकांदरम्यान होती. दुर्ग पोस्ट कमांडरने फोटो आणि ठिकाण राजनांदगाव पोस्ट कमांडरला पाठवले.राजनांदगाव स्टेशनवर संशयित सापडला नाही. यानंतर दुर्ग स्टेशनवर दोन पथके तयार करण्यात आली.जेव्हा ट्रेन आली तेव्हा संशयित व्यक्ती समोरच्या जनरल डब्यात (199317/सी) बसलेला आढळला. आयपीएफ एस के सिन्हा, कॉन्स्टेबल श्रीराम मीना आणि लेडी कॉन्स्टेबल निर्मला यांनी संशयिताला पकडले.

मुंबई पोलिसांकडून मिळाला दुजोरा 

संशयिताचा फोटो मुंबई पोलिसांना पाठवण्यात आला. संशयित आरोपीला मुंबई पोलिस अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलण्यास भाग पाडण्यात आले. यानंतर मुंबई पोलिसांकडून याला दुजोरा देण्यात आला. मुंबई पोलिसांचे पथक आज रात्री 8 वाजता रायपूरला पोहोचून संशयिताला ताब्यात घेणार आहे. संशयिताला सध्या आरपीएफ चौकी दुर्ग येथे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आले आहे.

सैफ अली खानवरील हल्ल्याचा आरोपी ज्ञानेश्वरी एक्सप्रेसने प्रवास करत असल्याची माहिती आज दुपारी साडेबारा वाजता जुहू पोलिसांकडून आम्हाला माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही एक पथक तयार केले आणि आरोपीला पकडले. मुंबई पोलीस ज्याचा शोध घेत होते हा तोच असल्याची पुष्टी झाली आहे. डीजी आरपीएफ मनोज यादव यांनी झी 24 तासला यासंदर्भात माहिती दिली. संशयित आकाश कनौजिया तिकीट नसताना ट्रेनमध्ये बसला होता.  त्याच्याजवळ एक फास्ट ट्रॅक बॅग देखील होती. जी आता जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली. तेव्हा त्याने प्रथम नागपूरला जात असल्याचे सांगितले आणि नंतर बिलासपूरला जात असल्याचे सांगितले.

काय म्हणाले मुंबई पोलीस?

ही व्यक्ती अजूनही संशयित आहे. आम्ही रेल्वे पोलिसांना कळवले होते. पडताळणीनंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी माहिती परिमंडळ 9 चे पोलीस निरीक्षक गेडाम दीक्षित यांनी दिली आहे.