कोकणचा हापूस आंबा मुंबईत दाखल; एका पेटीसाठी मोजावी लागतेय 'इतकी' रक्कम

Konkan Hapus Mango : कोकणातील जगप्रसिद्ध हापूस आंब्याचा हंगाम आता खऱ्या अर्थानं सुरू झाला असून, यंदाच्या हंगामातील हापूसची पहिली पेटी मुंबईत दाखल झाली आहे.   

Updated: Jan 28, 2025, 11:50 AM IST
कोकणचा हापूस आंबा मुंबईत दाखल; एका पेटीसाठी मोजावी लागतेय 'इतकी' रक्कम title=
seasons first Konkan alphonso mango arrived in navi mumbai vashi apmc market

स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : (Konkan Hapus Mango) उन्हाळ्याची चाहूल लागत नाही तोच कोकणातील अनेक आंब्याच्या बागांमध्ये झाडांवर मोहोर फुलला असून, आता मुंबईत तर थेट कोकणातला हापूस आंबाच दाखल झाला आहे. जानेवारी महिन्यातच बाजारात हापूस दाखल झाल्यानं पहिल्यावहिल्या पेटीसाठी किती रक्कम मोजावी लागतेय याचीच उत्सुकता सध्या सामान्यांमध्ये पाहायला मिळत आहे. 

नवी मुंबईतील वाशी येथे असणाऱ्या एपीएमसी फळ बाजारात यंदाच्या हंगामातील पहिली हापूस आंब्याची पेटी दाखल झाली आहे. कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्याकडून पहिल्या सत्रात हापूस आंब्याच्या 24 पेट्या इथं दाखल झाल्या असून एपीएमसी बाजारात या हापूस आंब्याची विधिवत पूजाही करण्यात आली. आंब्याच्या एका पेटीत 4 ते 6 डझन आंबे असून या एका पेटीला 10 ते 15 हजार इतका भाव मिळत आहे. यंदा आंब्याचा हंगाम काहीसा लांबला असला तरी मार्च पर्यंत आंब्याची चांगली आवक होईल असा विश्वास आंबा व्यापारी व्यक्त करत आहेत. 

आंब्याच्या पेटीसाठीची ही गडगंज रक्कम पाहता, या किमतीत एखाद्या चांगल्या कंपनीचा बेस मॉडेल स्मार्टफोन सहज खरेदी करता येईल असंच अनेकांना वाटेल. येत्या काळात आंब्याच्या या दरांमध्ये चढ उतार पाहायला मिळतील हे स्पष्ट असलं तरीही सध्याचे हे दर अनेकांनाच आश्चर्याचा धक्का देत आहेत हे मात्र नाकारता येत नाही. 

हापूसआधी केशर आंब्यानं मारली बाजी 

यंदा हापूरआधी कोकणातील केशर आंब्याची पेटी वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबई मार्केटमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळालं होतं. ज्यामुळं बाजारपेठांमध्येही हापूसआधी केशरच हजेरी लावणार हे चित्र स्पष्ट झालं होतं. देवगड तालुक्यातील शेतकरी शकील मुल्ला  यांच्या आंबा बागेतील ही केशर आंब्याची पेटी असल्याचं सांगण्यात आलं असून, एका पेटीमध्ये पाच डझन आंबे होते. 

हेसुद्धा वाचा : कैलास मानसरोवर यात्रेसाठी किती खर्च येतो? पर्वतापुढे नतमस्तक होतानाचा क्षण आणि A to Z माहिती एका क्लिकवर 

दरम्यान, आता येत्या दिवसांमध्ये आंब्याचे दर, आंब्याची आयात आणि निर्यात यासंदर्भातील अनेक वृत्त समोर येणार असून, परदेशी बाजारात कोकणातील या आंब्याला नेमका कसा आणि किती दर मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तूर्तास हजारोंच्या किमतीत विकले जाणारे हे आंबे आता कोणापर्यंत पोहोचणार हे पाहणंही औत्सुक्याचं असेल.