विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षाकडून शरद पवारांची एकाकी झुंज

विरोधी पक्षाकडून सध्या एकच नेता चर्चेत आहे.

Updated: Sep 20, 2019, 07:18 PM IST
विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षाकडून शरद पवारांची एकाकी झुंज title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत विरोधी पक्षाकडून सध्या एकच नेता चर्चेत आहे. ते म्हणजे शरद पवार. वयाच्या ७८ व्या वर्षी महाराष्ट्रभर फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. ही त्यांची हतबलता आहे का? अभी तो मैं जवान हुँ असं शरद पवार म्हणत आहे. राष्ट्रवादीतले बडे बडे नेते पक्ष सोडून गेले. अगदी नातेवाईकांनीही साथ सोडली. पण तरी देखील पवार खचले नाहीत. भाजप-शिवसेना सरकार उलथवून टाकण्याची भाषा अजूनही पवार करत आहेत.

वयाच्या ७८ व्या वर्षी अशी धडपड, राज्यव्यापी दौरे करण्याची वेळ पवारांवर का आलीय, हा मोठा सवाल आहे. ही शरद पवारांची हतबलता असल्याचं मानलं जातं आहे.

कारण पवारांचा वारसा चालवू शकेल, असा नेताच राष्ट्रवादीमध्ये सध्या नाही. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळं अजित पवारांचे हात दगडाखाली आहेत. सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाला मर्यादा आहेत, हे संवाद यात्रेतूनही स्पष्ट झालंय. आघाडी सरकारच्या काळात मंत्रिपदं भोगणारे बडे नेते मूग गिळून गप्प बसलेत. तर शिवसेनेतून आयात केलेले डॉ. अमोल कोल्हे आणि भाजपातून आलेले धनंजय मुंडे हेच सध्या राष्ट्रवादीचं व्यासपीठ गाजवतायत. अमोल मिटकरी, सक्षणा सलगर अशा मोजक्या युवा नेत्यांची मर्यादित साथ लाभते आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवारांनाच निशाणा केलं आहे. त्यामुळं विधानसभेच्या रणसंग्रामात सत्ताधारी भाजप-शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीचा अँग्री ओल्ड मॅन असा सामना रंगणार आहे.