Floor Test मध्येही शहाजीबापू सुपरहिट; विधानसभेत जे घडलं ते पाहून तुम्हाही म्हणाल मानलं राव...

बहुमताचा कौल शिंदे- फडणवीस सरकारकडे अगदी सहजपणे जाताना दिसला. 

Updated: Jul 4, 2022, 12:31 PM IST
Floor Test मध्येही शहाजीबापू सुपरहिट; विधानसभेत जे घडलं ते पाहून तुम्हाही म्हणाल मानलं राव... title=
shivsena MLA Shahaji bapu patil won the hearts again during vidhansabha floor test Viral video

मुंबई : महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन झालेल्या सरकारची बहुमत चाचणी नुकतीच विधानसभेत पार पडली. ज्याची प्रतीक्षा होती, तो क्षण अखेर समोर आला आणि शिंदे-फडणवीस सरकारच्या वतीनं असणाऱ्यांनी त्यांच्या पारड्यात आपली मतं दिली. (shivsena MLA Shahaji bapu patil won the hearts again during vidhansabha floor test Viral video)

आवाजी मतदानाच्या प्रक्रियेनंतर ज्यावेळी आमदारांनी आपली मतं नोंदवण्यास सुरुवात केली तेव्हा बहुमताचा कौल शिंदे- फडणवीस सरकारकडे अगदी सहजपणे जाताना दिसला. 

विधानसभेत हे मतदान लक्षवेधी ठरण्याची कारणं बरीच होती. पण, त्यातही शिवसेनेचे सांगोल्यातील आमदार शहाजीबापू पाटील. त्यांच्या 'काय झाडी.... काय डोंगार.... काय हाटिल' या डायलॉगनं गेल्या काही दिवसांपासून सर्वांनाच वेड लावलं. 

मीम्स म्हणू नका की गाणी, सगळीकडे शहाजीबापूंचीच चर्चा. बहुमत चाचणीमध्येही तेच सुपरहिट असल्याचं पाहायला मिळालं. ज्यावेळी आपलं मत देण्यासाठी म्हणून ते उभे राहिले, तेव्हा तिथं असणाऱ्या सर्वच आमदारांनी कल्ला करण्यास सुरुवात केली. 

एका डायलॉगनं शहाजीबापू पाटील हे नाव गावखेड्यापासून इथं शहरातही प्रत्येकाच्या तोंडी पाहायला मिळत आहे. राज्यात सुरु असणारा सत्तासंघर्ष निकाली लागल्यानंतरही अनेकांनी तर, या आमदार महोदयांना राज्याच्या मंत्रीमंडळात पर्यटन मंत्री हे पद द्यावं अशी मागणीही केली आहे.

गोष्ट बहुमताची... 
Floor Test मध्ये शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आणि भाजप सरकारच्या बाजूने एकूण 164 आमदारांनी मतदान केलं तर, महाविकास आघाडीच्या बाजूने 99 आमदारांनी मतदान केलं. 

शिवसेनेच्या 55 आमदारांपैकी शिंदे गटासोबत 40 आमदार गेल्यामुळं महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं आहे. विश्वासदर्शक ठराव जिंकून सत्तेवर शिक्कामोर्तब केला आहे.