मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संभाव्य संकटाची तीव्रता पाहता देशभरात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. ज्या धर्तीवर तातडीने देशातील रेल्वेपासून, महामार्ग प्रकल्प आणि इतर सर्व लहानमोठे उद्योगही ठप्प झाले. याचा थेट परिणाम हा हातावर पोट असणाऱ्या आणि रोजंदारी भत्त्यावर काम करणाऱ्या लाखो स्थलांतरित मजुरांवर झाला.
पोटाची खळगी भरण्यासाठी म्हणून परराज्यांत अर्थार्जनासाठी गेलेल्या याच मजुरांना आता स्थानिक प्रशासन, रेल्वे मंत्रालय यांच्या प्रयत्नांनी त्यांच्या राज्यांमध्ये पाठवण्यात येत आहे. अनेक दिवसांच्या अडचणीचा काळ अनुभवल्यानंतर, रितसर चाचणी करुनच आपल्या राज्यांच्या दिशेने निघालेल्या या मजुरांच्या बाबतीत उत्तर प्रदेश सरकारने मात्र सीमेवरुनच परत जा असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे मजुरांप्रती सरकारची ही वागणूक माणुसकीला धरुन नाही. मुळात हे श्रमिक आहेत भटके प्राणी नाहीत असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या 'सामना'च्या अग्रलेखातून योगी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
उत्तर प्रदेश सरकारने मजुरांच्या बाबतीत घेतलेला यु टर्न आणि हे क्रूर वागणं म्हणजे बगला वर करणं. ज्यामुळे जवळपास ३०-३५ लाख स्थलांतरित मजुरांच्या जीवाची तडफड होत आहे, अशा थेट शब्दांत योगी सरकारच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. काल- परवापर्यंत अनेक नेतेमंडळी, राजकीय पक्षांसाठी 'व्होट बँक' असणारा हाच मजुर वर्ग आज हलाखीच्या परिस्थितीतून जात आहे.
'सीमेवरुनच परत जा', असं सांगत आपल्याच राज्यात मजुरांना येऊ न देण्याचा हा प्रकार पालघरमधील हत्याकांडाइतकाच निर्घ्रृण आणि अमानुष असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे. शिवाय, आता मात्र हा मजुर वर्ग, अर्थात अग्रलेखात म्हटल्याप्रणामए व्होट बँकेचा हा कचरा आपल्या अंगणात नको ही आडमुठी भूमिका टीकेस पात्र आहे, असाच सूर शिवसेनेकडून आळवण्यात आला.