Shraddha Murder Case : दिल्लीत श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात दररोज खळबळजनक खुलासे समोर येत आहेत. श्रद्धा वालकरने (Shraddha Walkar) 2020मध्येच आफताबविरोधात (Aaftab Poonawala) पोलिसांत तक्रार केली होती. हत्या करुन तुकडे करण्याची धमकी दिल्याचा उल्लेख देखील श्रद्धाने या तक्रारीत केला होता. हे पत्र आता व्हायरल झाले आहे. यावर आता भाजपने (BJP) काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
आशिल शेलार यांचं ट्विट
भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी या प्रकरणात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करणारं एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय, श्रध्दा वालकरने महाराष्ट्र पोलीसांना (Maharashtra Police) दिलेल्या पत्रावर आता पोलीस आम्ही दोन्ही कुटुंबांना बोलावून समज दिली असेही सांगू शकतात. म्हणून आमचे काही प्रश्न...
भाजपने उपस्थित केले सवाल
1) दखलपात्र गुन्हा अदखलपात्र करुन हा विषय "टेबलावर" मिटवण्यात आला का?
2) तक्रार मागे घेण्यासाठी श्रध्दावर दबाव आणला गेला का?
3) गंभीर गुन्हा घडू शकतो याची स्पष्ट कल्पना पिडीता देत असल्याने गुन्हा दाखल करुनच चौकशी का केली नाही?
4) प्रकरण दाबले तर त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यानंतर पोलीसांनी नजर का ठेवली नाही?
5) हे प्रकरण दडपण्यासाठी पोलीसांवर कुणाचा दबाव होता का?
6) तक्रारीचा दखल घेण्यासाठी एक महिन्याचा विलंब का झाला
7) पोलीसांनी दोन्ही कुटुंबाकडून जे लेखी घेतले त्यामध्ये तारखांची खाडाखोड का?
श्रध्दाच्या खूनानंतर तत्कालीन सत्ताधारी पक्षांनी निषेध का केला नाही? गोलमाल है...म्हणून चौकशी व्हायलाच हवी! असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
श्रध्दा वालकरने महाराष्ट्र पोलीसांना दिलेल्या पत्रावर आता पोलीस आम्ही दोन्ही कुटुंबांना बोलावून समज दिली असेही सांगू शकतात.
म्हणून आमचे काही प्रश्न
1) दखलपात्र गुन्हा अदखलपात्र करुन हा विषय "टेबलावर" मिटवण्यात आला का?
2) तक्रार मागे घेण्यासाठी श्रध्दावर दबाव आणला गेला का?
(1/3) pic.twitter.com/bhwNS6b3LB— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 23, 2022
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
राज्याचे उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात मोठं वक्तव्य केलं आहे. 2020 ला श्रद्धा वालकरने जिवाला धोका असल्याचं पत्र महाराष्ट्राच्या पोलीसांना लिहीलं होते. ते पत्र माझ्याकडे पण आलंय. अत्यंत गंभीर पत्र होतं. पण, त्याच्यावर कारवाई का झाली नाही याची माहिती नाही. चौकशी का झाली नाही याबद्दल कोणावरही दोषारोपण करू इच्छित नाही. मात्र, याची चौकशी व्हायला हवी. अशा प्रकारच्या पत्रावर कारवाई का होत नाही. त्या पत्रावर कारवाई झाली असती तर आज श्रद्धाचा जीव वाचला असता असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आफताबची पॉलीग्राफ टेस्ट उद्या होणार
दरम्यान श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याच्या पॉलीग्राफ टेस्टचं दुसरं सेशन आज होऊ शकलं नाही. आफताबला खूप ताप असल्याने आज टेस्ट होऊ शकली नाही. फॉरेंसिक विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही टेस्ट उद्या म्हणजे गुरुवारी होऊ शकते. पॉलीग्राफी टेस्टनंतरच आफताबची नार्को टेस्ट होणार आहे. पॉलीग्राफी टेस्टसाठी काही प्रश्नांची यादी तयार करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण घटनाक्रमाचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. पोलिसांना श्रद्धाच्या शरीराचे 18 तुकडे आतापर्यंत सापडले आहेत. पण अद्याप तिचं शीर आणि काही तुकडे सापडायचे आहेत.
काय होतं नेमंक प्रकरण?
12 नोव्हेंबरला आफताब पुनावाला या तरुणाला श्रद्धा वालकर या तरुणीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. दिल्लीतल्या एका भाड्याच्या घरात लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये रहाणाऱ्या आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले आणि ते मेहरौलीच्या जंगलात फेकून दिले. त्याआधी त्याने ते तुकडे घरातल्या फ्रीजमध्ये ठेवले होते.