मुंबई : मुंबईतील वडाळा भागात लोढा ग्रुपच्या 'न्यू कफ परेड' रेसिडेन्सी कॉम्प्लेक्सच्या बांधकामाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडिओत तब्बल तीन कोटी रुपये खर्च केल्यानंतरही घरखरेदीत आपली फसवणूक झाल्याचा आरोप मुंबईचे रहिवासी शिल्पी थार्ड यांनी केला होता. यावर आता 'लोढा ग्रुप'च्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आलंय. यामध्ये दोन तक्रारदार नसून, 'खंडणीखोर' असल्याचं म्हटलंय. हे व्हिडिओ दिशाभूल करणारे असल्याचंही 'लोढा ग्रुप'चं म्हणणं आहे.
तक्रारदारांना खरंच तक्रार करायची होती, तर त्यांनी सोशल मीडियाचा आधार न घेता न्यायालयाकडे दाद मागायला हवी होती. परंतु, त्यांचं उद्दिष्ट खंडणी वसूल करण्याचं आहे, असा आरोप तक्रारकर्ते शिल्पी थार्ड आणि त्यांचे मित्र आणि सामाजिक कार्यकर्ते कृष्णराज राव यांच्यावर करण्यात आलाय.
तक्रारकर्त्यांनी केलेले आरोप निराधार असून, केवळ चुकीच्या पद्धतीनं तथ्य सादर करणं आणि त्याद्वारे आर्थिक लाभ मिळवण्याचा हा प्रयत्न असल्याचा पलटवार लोढा ग्रुपनं केलाय.
दोन व्यक्तींनी केलेले आरोप निराधार आहेत आणि तथ्ये चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आल आहेत. बदनामीकारक कृत्यांद्वारे आर्थिक लाभ मिळवणे याहूनही काही वाईट नाही.
या घराच्या भिंती निर्माण करताना ड्रायवॉलचा वापर करण्यात आला होता. परंतु, या भिंती इतक्या पोकळ आहेत की त्यावर एक बुक्का मारताच त्या भिंतीला मोठं भगदाड पडू शकतं, असा आरोप शिल्पी यांनी एका व्हिडिओ प्रात्यक्षिकामधून केला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना लोढा ग्रुपच्या वतीनं 'ड्रायवॉल हे अत्याधुनिक आणि महागडं तंत्रज्ञान असून ते बुर्ज खलिफासारख्या अनेक बांधकामांमध्ये वापरण्यात आलंय' असंही म्हटलं गेलंय.
शिल्पी थार्ड यांनी गेल्या वर्षी या घराचा ताबा घेतला होता. घरात ड्रेनेजचं काम सुरू असताना एका थर्ड पार्टी आर्किटेक्टला बोलावून चौकशी केली तेव्हा घराच्या भिंती खूपच तकलादू असल्याचं लक्षात आलं. इमारतीचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे त्याला ऑक्युपेशन सर्टिफिकेट कसं काय मिळू शकतं? असा सवालही त्यांनी केला होता. याविषयी रितसर पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचं थार्ड यांनी म्हटलं होतं.