मुंबई : आज हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) दुसऱ्या दिवशी सभागृहात सत्ताधारी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि विरोधी पक्ष भाजप (BJP) यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या. यावेळी शाब्दिक चकमक रंगली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यात शाब्दीक सामना पाहायला मिळाला. यावेळी तर अजित पवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांना मला पाडून दाखवा, असे जाहीर आव्हानच दिले.
ही ठिणगी पडण्याचे कारण तसेच आहे. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात येत होता. यावेळी सुधीर मुनगंटीवार पुरवणी मागण्यांवर चर्चा करत असताना ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत होते. सुधीर मुनगंटीवार सरकारवर आरोप करत असताना अजित पवार त्यांना उत्तर देण्यासाठी उभे राहिले. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी माझ्या भाषणात जो अडथळा आणतो तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही, असे म्हटले. त्यानंतर अजित पवार यांनीही त्यांना आव्हानच दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्या शैलीत मी तुमचे आव्हान स्वीकारतो, मला पाडून दाखवा असे उत्तर दिले.