Traditional Navratri Bhondla Dance : आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरु होणा-या नवरात्री उत्सवास जितके महत्व आहे तितकेच महत्व आश्विन पक्षात हस्त नक्षत्रापासून सुरु होणा-या 'भोंडला' सणास आहे. पूर्वीच्या काळी महिलांनी चूल आणि मूल या पलीकडे काही जगच नव्हते. अशा वेळी या सणाच्या निमित्ताने महिला आपल्या सखींना भेटून एकमेकींच्या सुख दु:ख वाटायच्या. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने भोंडला खेळला जातो, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात या खेळाला हादगा म्हणूनही संबोधले जाते. विदर्भात या भोंडल्याला भुलाबाई असेही म्हटले जाते. अशा या सणाला आश्विन हस्त नक्षत्रात फार महत्व आहे.
आणि नवरात्रिच्या याच निमित्ताने ठाणे येथील प्राइड पाम्स सोसायटी मध्ये तब्बल 50 महिलांनी एकत्र येऊन नऊवारी साडया नेसुन पारंपरिक भोंडला नृत्य सादर केला.
भोंडल्याचा या कार्यक्रम महिलांपेक्षा जास्त मुलींसाठी फार विशेष असतो. भोंडल्याचा हा खेळ सुरु करण्यापूर्वी मुली एका पाटावर हत्तीची रांगोळी काढून वा चित्र काढून त्याभोवती फेर धरतात. त्यानंतर ऐलमा पैलमा या गाण्याने पारंपारिक गाणी म्हणत फेर धरले जातात. कोकणात अशा पद्धतीने हा खेळ रंगला जातो.
या सणासाठी घराच्या भिंतीवर सोंडेत माळ धरलेल्या व समोरासमोर तोंड केलेल्या दोन हत्तींचे रंगीत चित्र लावले जाते. घाटावर कुमारिका पाटावर डाळ तांदूळ किंवा धान्याने हत्ती काढतात. हत्ती हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो त्यामुळे त्याची पूजा करुन घरात समृद्धी येते असा यामागील विश्वास आहे.
ऐलमा पैलमा गणेश देवा पासून गणेशाला वंदन करून मग एक एक करत चिडवणारी, टेर ओढणारी किंवा खिरापतीची मागणी करणारी गाणी गायली जातात आणि मग आड बाई आडोणी या गाण्याने या खेळने भोंडल्याची सांगता करतात.पूर्वीच्या काळी स्त्रियांना आपल्या रोजच्या कामातून विरंगुळा मिळावा म्हणून अशा प्रकारचे सण उत्सव साजरे केले जात होते. तर अलीकडे या परंपरेचा वारसा जपण्यासाठी अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.