मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दुरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी उद्धव यांनी मोदींना गुरुवारी संध्याकाळी शिवतीर्थावर होऊ घातलेल्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याचेही समजते. याशिवाय, शिवसेनेकडून पंतप्रधान कार्यालयात शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिकाही पाठवण्यात आली आहे. तत्पूर्वी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले.
Uddhav Thackeray has talked to PM Narendra Modi over phone and invited him to tomorrow's oath taking ceremony. This was in addition to an invitation letter which was sent to PM Modi. #Maharashtra pic.twitter.com/q19CUDiXIr
— ANI (@ANI) November 27, 2019
सध्या मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरु आहे. देशातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांना या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण धाडण्यात आले आहे. उद्धव यांचा शपथविधी सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असावा, अशी शिवसेनेची इच्छा आहे. त्यासाठी सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर खास सेट उभारण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिवतीर्थावर उद्या पार पडणाऱ्या शपथविधीवेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सहा मंत्री शपथ घेतील. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील प्रत्येकी दोन नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.