राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर राज्याच्या अतिसंवेदनशील भागात सतर्कतेचे आदेश

 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत भोंगे हटवण्याचं अल्टिमेटम दिलं आहे. 

Updated: Apr 19, 2022, 09:57 PM IST
राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर राज्याच्या अतिसंवेदनशील भागात सतर्कतेचे आदेश title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता राज्याच्या अतिसंवेदनशील भागात सतर्कतेचे आदेश गृहविभागानं दिलेत. मुंबईतील मालाड मालवणी, मानखुर्द, मोमिनपूरा, शिवाजीनगर भागात तसंच मालेगाव, औरंगाबाद, सोलापूर, अमरावती, अकोला जिल्ह्यातील काही भाग संवेदनशील आहे. त्याठिकाणी सतर्कतेच्या सूचना दिल्याची माहिती गृह मंत्रालयातल्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. 

संवेदनशील भागात पोलीस पेट्रोलिग वाढवलं असून सोशल मीडियावर चुकीचे संदेश टाकणा-या व्यक्तींवर नजर आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत भोंगे हटवण्याचं अल्टिमेटम दिलं आहे. त्यावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संवेदनशील भागात अलर्ट देण्यात आला असून तेढ निर्माण करणा-यांवर कारवाई करण्याचा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे.

दुसरीकडे मुंबईतल्या मशिदींनी भोंग्यांबाबत मोठा निर्णय घेतला. ७२ टक्के मशिदींनी पहाटेचे भोंगे स्वतःहूनच बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मशिदींमध्ये पहाटे पाचच्या सुमाराला होणारी अजान ही भोंग्यांवरुन होणार नाही, असा निर्णय मुंबईतल्या ७२ टक्के मशिदींनी आपणहून घेतलाय. मुंबई पोलिसांनी मशिदी, भोंगे आणि डेसिबलसंदर्भात एक गुप्त सर्वे केला. त्यानंतर मशिदींनी स्वतःहूनच भोंगे बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.