भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर; 'या' तारखेला होणार लोकार्पण

Chhatrapati Shivaji Maharaj Temple : भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jan 27, 2025, 09:28 PM IST
भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर; 'या' तारखेला होणार लोकार्पण title=

Chhatrapati Shivaji Maharaj Temple Bhiwandi : महाराष्ट्राचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर भिवंडी येथे उभारण्यात येत आहे. अखेर या मंदिराच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला आहे. लोकार्पणनंतर शिवभक्तांसाठी हे मंदिर खुले होणार आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा या ठिकाणी साकारत आहे. येत्या 17 मार्च 2025 ला तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती दिनी प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचा लोकार्पणाच्या भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या ठिकाणी जी शिवरायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.  मैसूर येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज ज्यांनी आयोध्या राम लल्ला यांची मूर्ती साकारलेली आहे त्यांनीच शिवरायांची मूर्ती साकारली आहे. ही मूर्ती मैसूर येथून मराडे पाडा येथे आणण्यात आली आहे.

ही  मूर्ती आणायला गेले असता तिथून येत असताना  शिवेंद्र राजे भोसले महाराज तसेच उदयन राजे भोसले महाराज ,छ. संभाजी महाराजांच्या दूध आई धारउ गाडे पाटील तसेच हंबीरराव मोहिते यांचे वंशज या सर्वांच्या भेटी गाठी घेऊन त्यांना 17 मार्च कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज मंदिराची खास वैशिष्ट्ये

छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मंदिराची रचना गडकोट किल्ल्यासारखी आहे. दीड एकर जागेत हे मंदिर उभारण्यात येत आहे. मंदिरा भोवती तटबंदी आणि भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आलं आहे. या मंदिरात प्रवेश करताना भव्य दिव्य किल्ल्यात प्रवेश करत असल्यासारखे वाटते. तटबंदीच्या खाली 36 चबुतरे बांधले जात आहेत. या चबुतऱ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध इतिहासकालीन प्रसंगांचे देखावे साकारण्यात येणार आहेत.  मंदिरात येणाऱ्या सर्वभाषिक शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास कळावा यासाठी  मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये भाषांमध्ये देखाव्याची माहिती लिहण्यात येणार आहे. 

या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांची अखंड कृष्णशिला काळ्या पाषाणातून सहा फूट उंचीची सिंहासनारूढ मूर्ती साकारण्यात आली आहे.  अयोध्या येथील श्रीराम मंदिरात रामलल्ला यांची मूर्ती साकारणारे मैसूर येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मूर्तिकार अरुणयोगी राज यांनी ही मूर्ती साकारली आहे. या मंदिराचा गाभारा सभामंडप हा परिसर 2500 चौरस फूट क्षेत्राचा असून तटबंदी दीड एकर क्षेत्रात आहे. हे मंदिर सर्वांना प्रेरणादायी ठरेल.  येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिरच नाही तर गुरुकुल पद्धतीने शिक्षण देण्याची सुविधा दिली जाणार आहे. येथे शस्त्र प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा विचार आहे.