www.24taas.com, नवी दिल्ली
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सक्षम लोकपाल बिलासाठी पुन्हा एल्गार पुकारला आहे. केंद्रातलं सरकार हे मूकबधिर आणि संवेदनाहीन असल्याचा घणाघात अण्णांनी केला आहे. जंतरमंतरवर जाण्याआधी अण्णांनी राजघाटवर महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेतलं.
लोकपाल बिलासह भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्यांची सुरक्षा हा मुद्दाही अण्णांनी हाती घेतला आहे. मध्यप्रदेशात आयपीएस अधिकारी नरेंद्र कुमार यांची खाण माफियांनी केलेल्या हत्येचा मुद्दा आज अण्णा उचलून धरण्याची शक्यता आहे. तसंच विविध ठिकाणी आरटीआय कार्यकर्त्यांवर झालेल्या हत्येचा मुद्दाही अण्णा उचलणार आहेत.
आज लाक्षणिक उपोषण असले तरी आमचे आंदोलन सुरू राहील. सरकारला जाग यावी यासाठी लवकरच मोठे आंदोलन करणार आहोत, असेही अण्णा म्हणाले. दरम्यान, नेहमीप्रमाणे यंदाच्या आंदोलनाची सुरुवात राजघाट येथून गांधी समाधीच्या दर्शनानेच सुरू झाली. दर्शन घेऊनअण्णा हजारे जंतर मंतर येथे दाखल झाले आणि लाक्षणिक उपोषणाला सुरवात केली आहे.