www.24taas.com, नवी दिल्ली
माजी मुख्यमंत्री आणि आदर्श घोट्याळ्यात आरोप ठेवण्यात आलेले अशोक चव्हाण यांची कैफियत मांडण्यासाठी दिल्लीत गेलेल्या अशोक चव्हाण समर्थक आमदारांना सोनिया गांधींनी भेट नाकारलीय. त्यामुळं आता चव्हाण समर्थक आमदार महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडणार आहेत.
अडचणीच्या काळात काँग्रेस पक्ष आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या पाठीशी उभा राहत नाही असा आऱोप करत अशोक चव्हाण यांच्या समर्थक आमदारांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. तसंच विरोधी पक्षांच्या आमदारांची कामे होतात मात्र काँग्रेसच्या आमदारांची कामे होत नाहीत असा आरोप करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. ही कैफियत मांडण्यासाठी चव्हाण समर्थक आज दिल्लीला गेले होते. मात्र सोनियांनी भेट नाकारुन एक प्रकारे पृथ्वीराज चव्हाणांची साथ केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
तसंच अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये एकाकी पडल्याचंही बोललं जातंय. आदर्श प्रकरणात अशोक चव्हाणांवर सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलंय. त्यामुळं विधान परिषद आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समर्थकांमार्फत पक्षावर दबाव आणण्याची खेळी चव्हाण खेळण्याच्या प्रयत्नात होते. मात्र आजच्या घडामोडींवरुन चव्हाणांची डाळ शिजत नसल्याचं दिसून येतंय.