www.24taas.com, नवी दिल्ली
पेट्रोलची दरवाढ करण्याची वेळ का आली, हा खरा प्रश्न आहे. गेल्या 2 आठवड्यात डॉलरची किंमत 3 रुपयांनी महागल्याने तेल कंपन्यांच्या तोट्यात सातत्यानं वाढ होत होती. अशा परिस्थितीत मोठ्या दरवाढीशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. आंतरराष्ट्रीय बाजारत कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतरही भारतात पेट्रोलच्या दरवाढीचा भडका उडालाय.
याचं कारण आहे सातत्यानं होणारी रुपयाची घसरण..डॉलरच्या तुलनेत रुपयाची सातत्यानं घसरण सुरु आहे.. 8 मेपासून आत्तापर्यंत डॉलर तीन रुपयांनी महागलाय. मेच्या सुरुवातीला जेव्हा डॉलर 53 रुपयांवर होता, तेव्हा कच्च्या तेलाच्या प्रति बॅरलसाठी भारतीय कंपन्यांना 6095 रुपये मोजावे लागत होते.. आता 56 रुपये प्रतिडॉलरच्या हिशोबाने प्रति बॅरलसाठी 6440 रुपये मोजावे लागतायेत. याचा अर्थ असा की कच्च्या तेलाचा एक बॅरल 345 रुपयांनी महागलाय.
डॉलरच्या तुलनेत जर एका रुपयाचीही घसरण झाल्यास तेल कंपन्यांना दरवर्षी 8 हजार कोटींचं नकसान सहन करावं लागतं. तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार प्रतिलिटर पेट्रोलवर 8 रुपये तोटा सहन करावा लागतोय. 2011-2012 या आर्थिक वर्षात इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदूस्थान पेट्रोलियम य़ा कंपन्यांना फक्त पेट्रोलवर 4 हजार 860 कोटींचं नुकसान सहन करावं लागलंय. अशा परिस्थितीत पेट्रोलचे दर वाढवण्यापलिकडे कोणताही पर्याय तेल कंपन्यांसमोर नव्हता.