www.24taas.com, पंकज दळवी, मुंबई
जनता त्रस्त आणि राजा मस्त. हेच चित्र सध्या आपल्या देशात पहायला मिळतं आहे. केंद्रीय कॅबिनेट आणि राज्य मंत्र्यांनी गेल्या दोन वर्षात पेट्रोलवर आणि डिजेलवर तब्बल ३ कोटी ६७ लाख रूपये उडवले आहेत. पेट्रोल दरवाढीचा भडका उडाला. महागाईमुळे सर्वसामान्य होरपळून निघतात. पेट्रोलचे भाव गगनाला भिडल्यामुळे सामान्यांच्य़ा वाहन वापरावर मर्यादा आल्या आहेत. कारण पेट्रोलचे भाव परवडणारे नाहीत. मात्र दुसऱ्या बाजुला आपणच निवडुन दिलेले लोकप्रतिनिधी पेट्रोल,डिजेलवर करोडो रूपये उधळत आहेत. याबाबत माहितीच्या अधिकारातुन मिळालेली माहिती धक्कदायक आहे. केंद्रीय कॅबिनेट आणि राज्य मंत्र्यांनी गेल्या दोन वर्षात पेट्रोलवर आणि डिजेलवर तब्बल ३ कोटी ६७ लाख रूपये उडवले.
इंधनावर प्रचंड खर्च करणाऱ्या मंत्र्यांमध्ये विलासराव देशमुख आघाडीवर आहेत. विलासराव देशमुख आणि त्यांच्या खात्याच्या राज्यमंत्री अगाथा संगमा यांनी तब्बल १७ लाख १६ हजार रुपये इंधनावर खर्च केलेत आणि ३०,७१७ लिटर इंधन वापरलं. एस एम कृष्णा यांच्या परराष्ट्र खात्याने २३,८६१ लिटर इंधनासाठी १६ लाख ५१ हजार रुपये खर्च केले. गुलाम नबी आजाद यांनी १४ लाख ६० हजार रूपये इंधनावर खर्च केले तर २६,५५५ लिटर इंधन वापरलं. महिला आणि बाल विकास खात्याच्या मंत्री रेणुका चौधरी यांनी १८,९५२ लिटर पोट्रोल वापरलं आणि त्यासाठी १० लाख ७० हजार रुपये खर्च केले. खात्याच्या शरद पवार यांनी दोन वर्षात ९ लाख ६६ हजार रुपये इंधनावर खर्च केले. आणि १७ हजार ७२३ लिटर इंधन वापरलं.
युपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंत्र्यांना विमानात बिझनेस क्लास ऐवजी इकोनॉमी क्लासच्या वापर करण्याचे आदेश दिले होते. मात्र याच काळात विमानाचे पैसे वाचवणाऱ्या मंत्र्यांनी वाहन इंधानवर करोडो रूपये उधळले. वास्तविक केंद्रिय मंत्र्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वाहनाचा वापर दिल्लीतल्या दिल्लीत असतो. मंत्री जेव्हा आपापल्या मतदार संघात जातात तेव्हा विमानाने प्रवास करतात .मग तरीसुद्धा इंधानावर इतका खर्च कसा होतो त्यामुळे जनता त्रस्त आणि राजा मस्त हेच चित्र पहायला मिळतं.