Virat Kohli Ranji Trophy 2025 : सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीचे (Ranji Trophy 2025) सामने खेळवले जात असून यात अनेक स्टार क्रिकेटर विविध संघाकडून खेळताना दिसत आहेत. 2012 नंतर जवळपास 13 वर्षांनी भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली रणजी ट्रॉफी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. गुरुवार 30 जानेवारी पासून दिल्ली विरुद्ध रेल्वे यांच्यातील सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला. यात विराट कोहलीला (Virat Kohli) रणजी सामन्यात खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांनी स्टेडियमवर गर्दी केली होती. या दरम्यान एक फॅन विराटला भेटण्यासाठी सुरक्षा जाळीवर ओलांडून जाण्याचा प्रयत्न करत होता. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्ली संघाने 19 धावा आणि एका डावाने सामना जिंकून रेल्वे संघाचा पराभव केला. दिल्ली संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि रेल्वे संघाला फलंदाजीचे आव्हान दिले. पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करून रेल्वेने 241 धावा केल्या. यात उपेंद्र यादवने सर्वाधिक 95 धावा केल्या. दिल्ली संघाकडून फलंदाजी करताना सर्वाधिक धावा आयुष बडोनीने 99, सुमित माथूरने 86 धावा केल्या. यासह दिल्लीने फलंदाजी करून तब्बल 374 धावा केल्या. त्याच्यासमोर रेल्वेचा संघ दुसऱ्या इनिंगमध्ये केवळ 114 धावांवर ऑल आउट झाला. त्यामुळे दिल्ली संघाने सामना जिंकला.
शनिवारी अरुण जेटली स्टेडियमवर सुरु असलेला सामना संपला. तेव्हा सामना संपल्यानंतर काही प्रेक्षक मैदानात घुसण्याचा प्रयत्न करत होते. यात विराटचा एक फॅन त्याला भेटण्यासाठी सुरक्षा जाळी भेदून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला. सुरक्षा जाळीवर चढणाऱ्या व्यक्तीला पाहून स्टेडियमवरील सुरक्षा रक्षक त्याच्या जवळ गेले आणि त्याला खाली ओढू लागले. मात्र तरी देखील फॅन ऐकत नव्हता तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्याला चांगलाच चोप दिला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
More fans tried to breach the security and meet Virat but he was kept by Security Guards pic.twitter.com/h2j4t9tey3
— Virat Kohli Fan Club (Trend_VKohli) February 1, 2025
विराट कोहली 2012 नंतर पहिल्यांदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये फलंदाजीसाठी उतरणार असल्याने त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु विराट रेल्वे विरुद्ध फलंदाजीसाठी उतरल्यावर समाधानकारक धावा करू शकला नाही आणि युवा गोलंदाजाच्या बॉलिंगवर क्लीन बोल्ड झाला. विराटने 15 बॉल खेळून 6 धावा केल्या. दरम्यान त्याने एक चौकार लगावला. विराटला बाद केल्यावर गोलंदाज हिमांशु आणि त्याच्या संघाने आक्रमक सेलिब्रेशन केले. विराट कोहलीने आतापर्यंत रणजी ट्रॉफीमध्ये एकूण 23 सामने खेळले असून या सामन्यांमध्ये 50.77 च्या सरासरीने 1574 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 5 शतक देखील लगावली आहेत.