Benefits of Eating Makhana: सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होण्याचा धोका वाढत आहे. अशा परिस्थितीत लोक अशा पदार्थांचं सेवन करणं पसंत करतात जे आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहेत. फावल्या वेळेत किंवा संध्याकाळच्या वेळेत काहीतरी हलके खाण्याचे बऱ्याचजणांच्या मनात येत असते. हलके त्यासोबतच पौष्टीक खाण्याकडे अनेकांचा कल असतो. यावेळी तेलविरहित आणि एअर फ्राय मखाणा हा अगदी चांगला पर्याय ठरु शकतो. मखाणे हे कोणत्या सुपरफूडपेक्षा कमी नाहीत. इतकेच नव्हे तर केंद्रीय बजेट 2025 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 'मखाणा' या पौष्टीक पदार्थाचा उल्लेख केला आहे. तसेच बिहार मध्ये मखाना बोर्डाची स्थापना होणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचंसुद्धा त्यांनी सांगितलं.
मागील काही वर्षात बिहारचे 'मखाणा' हे सुपरफूड जगप्रसिद्ध झाले. विविध राज्यात या पदार्थाला चांगलीच ओळख मिळाली. साधारणपणे मखाणे तेलात फ्राय करुन त्याचे सेवन केले जाते जेणेकरुन शरीरातील कॅलरीचे प्रमाण वाढते. एअर फ्राय करुन मखाण्याचे सेवन केल्याने ते शरीराला अधिक लाभदायक ठरते.
मखाण्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज आणि फायबर असतात. वजन कमी करण्याच्या दृष्टीने मखाणे फायदेशीर ठरले आहेत. मखाण्याचे सेवन केल्याने अनहेल्दी खाण्याचे प्रमाणसुद्धा कमी होते.
मखाण्यात सॅचुरेटेड फॅट आणि कोलेस्ट्रॉल नसते. त्यामुळे मखाणे हे हृदयाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आरोग्यदायी मानले गेले आहेत. अधिक तेलाचा वापर नसल्यामुळे एअर फ्राय केल्यावरसुद्धा मखाणे हेल्दी राहतात. या गुणधर्मांमुळे मखाण्याचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते तसेच, हृदयाशी संबंधित आजारांचा धोका सुद्धा कमी होतो.
मखाण्यात लो ग्लाइसेमिक इंडेक्स असल्याकारणाने रक्तातील शूगरची वाढ वेगाने होत नाही. म्हणूनच मखाण्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते त्याचबरोबर हा पदार्थ डायबिटीजच्या रुग्णांसाठी एक चांगला पर्याय ठरु शकतो.
मखाण्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मखाण्याचे सेवन हाडांसाठी आणि दातांसाठी फायद्याचे ठरते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आहारात मखाण्याचा समावेश करायला हवा जेणेकरुन हाडं मजबूत राहण्यास मदत होईल.
फायबरयुक्त मखाणा पचनासाठीसुद्धा उत्तम पर्याय आहे. पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मखाण्याचे सेवन फायद्याचे ठरते. एअर फ्राय केल्यामुळे मखाण्यात अतिरिक्त तेल नसते. याच कारणामुळे मखाणा हलका आणि पचनासाठी फायदेशीर असणारा पदार्थ मानला जातो. मखाण्याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता आणि अपचनासारख्या समस्या दूर ठेवण्यास मदत होते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)