www.24taas.com, उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सीना कोळेगाव धरणातून सोलापूरला पाणी सोडण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर धरण परिसर आणि परांडा शहरात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. १२०० पोलीस आणि एसआरपीएफच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
यामुळं परांडा शहराला अक्षरश: पोलीस छावणीचे स्वरूप आलं आहे. त्यामुळं याठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. धरणाच्या १० किलोमीटर परिसर आणि शहरात जमावबंदी आदेश लागू केला असून आंदोलन किंवा निदर्शने करण्यास मनाई करण्यात आली आहे. आंदोलनातील शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक फौजदारी नोटीसा पाठवल्या आहेत.
पाणी सोडण्याची शासनाच्या भूमिका इथल्या स्थानिकांना समजावून सांगण्यासाठी जिल्हा प्रशासनानं बैठकांवर जोर दिला आहे. परंतू पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात आणि पोलिसांच्या बंदोबस्ताविरोधात शेतकऱ्यांत असंतोष वाढतो आहे.