चंद्रपूर पालिकेत कोण मारणार बाजी??

ऐतिहासीक पार्श्वभूमी असलेल्या चंद्रपूर शहराच्या स्थापनेला ५०० वर्ष पूर्ण झाली आहेत. पंचशताब्दीच्या पार्श्वभूमीवर शहरात आता महापालिका स्थापन झाली आहे. पहिल्या महापालिकेसाठी येत्या १५ तारखेला मतदान होणार आहे.

Updated: Apr 4, 2012, 05:09 PM IST

www.24taas.com, चंद्रपूर 

 

ऐतिहासीक पार्श्वभूमी असलेल्या चंद्रपूर शहराच्या स्थापनेला ५०० वर्ष पूर्ण झाली आहेत. पंचशताब्दीच्या पार्श्वभूमीवर शहरात आता महापालिका स्थापन झाली आहे. पहिल्या महापालिकेसाठी येत्या १५ तारखेला मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

 

देशात आणि राज्यात एकमेकांचे विरोधक असलेल्या काँग्रेस आणि भाजपनं गेल्यावेळी चंद्रपूर नगरपालिकेत गळ्यात गळे घालून सत्ता उपभोगली. राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेसनं चक्क भाजपशी हातमिळवणी केली. तर भाजपनं काँग्रेसच्या बंडखोर गटाशी युती केल्याचं गोंडस नाव देत पालिकेत काँग्रेससोबत संसार केला.

 

चंद्रपूर नगरपालिकेत ६१ सदस्य होते. त्यात काँग्रेसला १८, भाजपला १७, राष्ट्रवादीला १०, शिवसेनेला दोन तर अपक्ष आणि इतरांना १४ जागा मिळाल्या होत्या. यावेळीही काँग्रेसच सत्तेवर येईल असा दावा काँग्रेसचे नेते करत आहेत.

 

चंद्रपूरचा खासदार, आमदार भाजपचा, पालिकेतही भाजप, मात्र तरीही शहराचा विकास होऊ शकला नाही. त्यातच भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आता चंद्रपूरच्या सुधीर मुनगंटीवार यांच्याकडं आली. त्यामुळं भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. पंचशताब्दी निमित्त शहरासाठी अजितदादांनी अर्थसंकल्पात २५० कोटी रुपये दिल्याचं तुणतुण वाजवत राष्ट्रवादी काँग्रेसही आपलं घोडं दामटत आहे.

 

कोळसा, विविध खनिजांचा साठा, जवळपास २५ ऊर्जा निर्मिती केंद्रे चंद्रपूरात आहेत. चंद्रपूरच्या या अर्थपूर्ण स्थानामुळं महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी राजकीय पक्ष सरसावले आहेत. यात आता कुणाला यश येतं ते पहावं लागेल.