www.24taas.com, नाशिक
वरूणराजाचं आगमन लांबल्यानं नाशिकचा कांदा महागण्याची शक्यता आहे. पेरण्या लांबल्याने पोळ कांद्याचं पीक सप्टेंबरपर्यंत येणार आहे. त्यामुळे सध्या शेतात साठवलेला कांदा बाजारात कमी पडणार आहे.
पावसानं यंदा दोन महिने उशिरानंच दमदार एन्ट्री घेतली. त्यामुळे पावसाळी कांद्याची रोपं तयार करण्याची जून महिन्याची प्रक्रिया झालीच नाही. त्यातच कमी पावसामुळे पावसाळी कांदा लावण्याची शेतकरी हिंमत करायलाही धजत नाही. उन्हाळी कांद्याला प्रती क्विंटल चारशे ते पाचशे रुपये भाव मिळाल्यानं कांदा उत्पादक शेतकरी नाराज आहे. याचा परिणाम कांद्याच्या उत्पादनावर होणार आहे. जिल्ह्यातल्या लासलगाव, मनमाड, मालेगाव, कळवण, चांदवड तालुक्यांमध्ये पाऊस गायब आहे. लहरी हवामानामुळे फक्त सदोतीस टक्के कांद्याची पेरणी झालीय. सोयाबीनची पेरणी सर्वाधिक असल्यानं त्याचा फटका कांद्याला बसणार आहे.
राज्य सरकारची कांदा उत्पादकांबाबत असलेली धरसोड वृत्ती, निर्यात कधी सुरू तर कधी बंद अशा अवस्थेत शेतकरी कुठलीही रिस्क घ्यायला तयार नाहीत. गेल्या दशकात सर्वच वस्तूंच्या किंमती तिप्पट-चौपट झाल्या असताना कांद्याला मात्र जुनाच भाव मिळतोय. सहाजिकच शेतकरी नाराज आहे. शेतकऱ्यांच्या या नाराजीचा फटका सर्वसामान्यांनाही बसणार हे निश्चित.
.