झी २४ तास वेब टीम, कोल्हापूर
यंदाची दिवाळी ही कोल्हापूरातल्या शेतकऱ्यांसाठी अधिक गोड ठरली आहे. कोल्हापुरात पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे काढण्यात आले. गुळाला सहा हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी भाव मिळाला. कोल्हापूरातल्या शाहू मार्केट यार्डमध्ये कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गुळाचे सौदे करण्यात आले. सध्या कोल्हापूर भागात गुळाचा हंगाम सुरु आहे. दर्जानुसार 2600 पासून सहा हजारापर्यंत गुळाला भाव मिळतोय. या हंगामामध्ये गुळाचे हेच भाव स्थिर राहण्याची शक्यता आहे.
ऊस, कापूस यांना पुरेसा भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. शेतकऱ्यांमधील आत्महत्त्यांचे वाढते प्रमाण हा देखील सध्या महाराष्ट्रासमोरचा मोठा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत गुळाला आलेला विक्रमी भाव हे काहीसे सकारात्मक लक्षण मानले जात असून यामुळे कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.