www.24taas.com, पुणे
अंगाची लाही-लाही करणाऱ्या उन्हाचा त्रास माणसांबरोबर प्राणी आणि पक्ष्यांनाही होतोय. कात्रजच्या जंगलात पाण्याचे स्त्रोत आटल्यानं प्राण्यांचीही परवड होतेय. या प्राण्यांना पाणी मिळावं, यासाठी पुणेकरांनीच पुढाकार घेतलाय.
ऐन उन्हाळ्यात पुणेकरांसाठी एकवेळचाच पाणीपुरवठा होतोय. माणसांसाठी ही गत तिथे प्राण्यांची आठवण कुणाला? कात्रज जंगलातल्या हरीण, ससे, कोल्हे, लांडगे, माकडं अशा प्राण्यांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. याच प्राण्यांसाठी ‘जैन सोशल ग्रुप’नं कात्रजच्या घाटात विशेष हौद उभारलाय. उन्हाळा संपेपर्यंत साडे पाचशे लीटरचा हा हौद रोज भरला जाणार आहे.
पुणेकरांनी एक वेळच्या पाणी कपातीनंतर राजकारणी आणि प्रशासनाला धारेवर धरलं. त्यामुळे किमान त्यांची पुढची पाणी कपात तरी टळली आहे. प्राण्यांकडे मात्र अशी सोय नाही. त्यामुळे प्राण्यांसाठी माणसांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.